मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज भरघोस वेतनवाढ जाहीर केली. ही वेतनवाढ ४ हजार ८४९ कोटी रुपयांची असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात साधारण ३२ ते ४८ टक्के इतकी वाढ होणार आहे. राज्यातील १ लाख ५ हजार ६७९ एसटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. परंतु, रावते यांनी केलेली ही पगारवाड एकतर्फी असून कामगारांना ती मान्य नाही... यामध्ये दाखवण्यात आलेल्या आकड्यांत गोलमाल दिसून येतेय, असं सांगत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं ही वेतनवाढ नाकारलीय. 


संघटनांचा आक्षेप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिवहन मंत्र्यांनी केलेल्या एकतर्फी वेतनवाढीच्या घोषणेच्या माहितीचे अधिकृत आणि सुस्पष्ट पत्र मिळालेलं नाही. परंतु प्रथमदर्शनी या प्रस्तावात गोलमाल केलेली आकडेवारी दिसून येत आहे... संघटनेचा प्रस्ताव ३१ मार्च रोजी मूळ वेतन + ३५००७२.५७ असा होता... मात्र आता मीडियाला दिल्या गेलेल्या विनास्वाक्षरीच्या प्रसिद्धीपत्रकात फक्त २.५७ चं सूत्रं देण्यात आलंय... परंतु ३१ मार्चच्या रकमेत काही वाढ दिलेली दिसत नाही, असं  महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हटलंय. 


प्रस्ताव देऊन शब्द फिरवण्याचा प्रघात नव्याने महामंडळात आला आहे... या प्रस्तावाने कामगार समाधानी होईल असे वाटत नाही... पहिल्यांदाच अशा प्रकारची एकतर्फी घोषणा करून कामगारांवर स्विकृतीपत्रके भरण्याबाबत सुचविण्यात आलंय... ज्यांना हा प्रस्ताव मान्य नाही त्यांनी नोकरी सोडून कंत्राटी पद्धतीने नोकरी स्विकारण्याची सुवर्णसंधीच्या नावाखाली धमकीही दिली आहे. अगोदरच वेतनवाढीने त्रस्त झालेल्या कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न आहे... शनिवारी महामंडळाकडून सुस्पष्ट प्रस्ताव घेऊन लगेचच राज्यकार्यकारीणीची बैठक घेऊन संघटना यावर अंतिम निर्णय घेईल, असंही त्यांनी म्हटलंय.  


महामंडळानं जाहीर केली पगारवाढ


एसटी कर्मचाऱ्यांची अखेर पगारवाढ करण्यात आली आहे.  पाच वर्षे सेवा झालेल्या कनिष्ठ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांसाठी चार हजार ते नऊ हजार पगारवाढ होणार आहे. तर तीन वर्षे सेवा झालेल्या कनिष्ठ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांसाठी एक हजार ते पाच जार वेतनवाढ  करण्यात येणार आहे. जे कर्मचारी नुकतेच आले आहे त्यांना २००० रुपये वाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कर्मचारी यांना 12 हजार वेतनवाढ देण्यात येणार आहे. तिकीट दरवाढीबाबत 15 जूननंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी दिली आहे. वेतनवाढीमुळे एसटीच्या तोट्यात वाढ होणार असली तरी कर्मचारी भरती थांबवणार नसल्याचं रावतेंनी स्पष्ट केलं. ४७ हजार ते ५० हजार कर्मचाऱ्यांना नव्या वेतनवाढीचा लाभ होणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय.