मुंबई : २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांना निलंबित करण्यात आले आहे. गोविलकर आणि आणखी एक एपीआय जितेंद्र सिंगोट अशा दोघांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या सोहेल भामला याला सोडल्याच्या आरोपावरून या दोघा पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सोहेलच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. तो दुबईवरून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. 


मात्र आर्थिक गुन्हा शाखेत कामाला असलेल्या या दोघा अधिकाऱ्यांनी चौकशीनंतर सोहेलला सोडून दिले होते. कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी त्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.


२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी गिरगाव चौपाटीजवळ पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे आणि गोविलकर यांना कसाबला जिवंत पडकले होते. कसाबने केलेल्या हल्ल्यात ओंबळे शहीद झाले होते. गोविलकर आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांने इस्माईल खान याला ठार केले होते. गोविलकर यांना त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले होते.