दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विरार ते अलिबाग या १२३ किलोमीटरच्या मल्टी कॉरिडोरमुळे मुंबई आणि मुंबई लगतच्या शहरांचा चेहरा बदलणार असून या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुंबईवरील चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला. विरार ते अलिबाग या मल्टी कॉरिडोरमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८, ३, ४, ४-ब, १४ तसंच मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे या सर्व मार्गांना जोडणार आहे. यावर सात विकास केंद्र होणार असून यात विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि तळोजा एमआयडीसी यांचा समावेश आहे. यामुळे या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा कॉरीडोर नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटीलाही जोडणारा असल्यामुळे नवी मुंबई आणि ठाणे शहरातून जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक या शहरा बाहेरून जाणार आहे. यामुळे विरार ते अलिबाग हा प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या विविध मेट्रोंच्या कामाच्या प्रगतीची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. त्यानुसार दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व हा १६.५ किलोमीटरचा ६ हजार २०८ कोटी रुपयांच्या या मेट्रो प्रकल्पाचे ६८ टक्के काम पूर्ण झाले असून ही मेट्रो २०२० साली सुरू होईल.


मुंबई परिसरात गेल्या तीन वर्षात २२०.२८ किलोमीटर लांबीचे १ लाख १ हजार १६ कोटी खर्चाचे मेट्रो प्रकल्प मंजूर केले आहे.


- मुंबई मेट्रो ३ चे काम वेगानंसुरू आहे. ३३.५० किलोमीटर भूयारी सिंगल लाईन असलेल्या या मेट्रोचा खर्च २३ हजार १३६ कोटी असून त्याचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील बोगद्याचं काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त झालं आहे. याचा पहिला टप्पा २०२१ साली, दुसरा टप्पा जून २०२२ साली पूर्ण होईल.


- मेट्रो २ दहिसर मेट्रोही १८ किलोमीटरची असून त्याचा खर्च ४ हजार कोटी रुपये आहे. त्याचे काम ६५ टक्के काम पूर्ण झाले असून ती २०२० साली कार्यरत होईल.


- डी. एन. नगर - वांद्रे मेट्रो २-ब ६४ किलोममीटरची असून त्याचा खर्च १० हजार कोटी रुपयांचा आहे. २०२२ पर्यंत याचे काम पूर्ण होणार आहे.


- मेट्रो ४- अ कासारवडलवी ते गायमूखचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल.


- ठाणे - भिवंडी - कल्याण या २५ किलोमीटर लांबीच्या आणि ८ हजार ४१७ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रोचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल.


- मेट्रो ७ - अ अंधेरी ते दहिसर - मीरा भाईंदरची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असून लवकरच त्यासाठी टेंडर दिलं जाईल.


- नवी मुंबई मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून २०२० सुरुवातीला ही मेट्रो सुरू होईल.


याशिवाय वसई-भाईंदर यांना जोडणारं खाडी पुलाचं बांधकामाच्या सर्व परवानग्या घेऊन टेंडर लवकरच काढणार, कमीत कमी वेळेत हे काम पूर्ण करणार याचा खर्च १ हजार ८१ कोटी रुपये आहे. एमयूटीपी ३ - ए प्रकल्पामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेची वाहतूक क्षमता ५० टक्क्यांनी वाढवतो आहे, ५५ हजार कोटी रुपयांची तरतुद केंद्र सरकारने यासाठी अर्थसंकल्पात केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.


ट्रान्स हार्बर लिंक


मुंबई - नवी मुंबई जोडणारा २२ किलोमीटरचा समुद्री मार्गाचे काम वेगानं काम सुरू आहे.


मुंबईची तहान भागवणार


मुंबईची २०६० पर्यंतची पिण्याच्या पाण्याची गरज दमनगंगा-पिंजाळच्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.


२०२० पर्यंत आंबेडकर स्मारक पूर्ण करणार


इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे, त्यात कुठलाही अडथळा नाही, सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. उंची वाढवण्याचा निर्णय झाला आहे. २०२० च्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होईल.


नाशिकला हायब्रीड मेट्रो


नाशिकला हायब्रीड मेट्रोचा प्रयोग करत आहोत. मेट्रोसारखीच असते पण रुळावर नाही तर चाकांवर चालते. या वर इलेक्ट्रिक बसही चालते. छोट्या बॅटरीची बस  फीडर म्हणून वापरून या मार्गावर चालू शकते आणि उन्हा उतरून 20 किमी चालवून लोकांना या हायब्रीड मेट्रोला जोडू शकते. नाशिकचा डीपीआर तयार झाला आहे. तो लवकरच कॅबिनेट मध्ये मंजुरीसाठी येईल.