मुंबई महापालिकेकडून चिनी वस्तूंची खरेदी, भाजपची देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी
मुंबई महानगपालिकेने चिनी कंपन्यांशी हातमिळवणी करुन घोटाळा केला आहे.
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने कोरोनासाठी लागणारी वैद्यकीय सामुग्री चीनकडून खरेदी केल्याच्या मुद्द्यावरून भाजप आता आक्रमक झाला आहे. चिनी कंपन्यांकडून वैद्यकीय साधनसामुग्री खरेदी केल्याबद्दल शिवसेनेवर देशद्रोहाचा खटला दाखल करा, अशी मागणी भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी केली आहे. तसेच मुंबई महानगपालिकेने चिनी कंपन्यांशी हातमिळवणी करुन घोटाळा केल्याचेही गुप्ता यांचे म्हणणे आहे. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर केंद्र सरकारने चिनी कंपन्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती. अनेक सरकार प्रकल्पांमधील चिनी कंपन्यांची कंत्राटे रद्द झाली होती. तसेच केंद्राने TikTok, ShareIt यासह चीनच्या ५९ मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती.
मात्र, मुंबई महानगरपालिकेने गलवान खोऱ्यात भारतीय जवान शहीद झाल्यानंतरही काही चिनी कंपन्यांकडून वैद्यकीय सामुग्री खरेदी केली होती. या सगळ्याची किंमत जवळपास चार कोटीच्या घरात आहे. परंतु, भारतीय कंपन्या या वैद्यकीय साधनसामुग्रीचे उत्पादन करत आहेत. मग मुंबई महानगरपालिकेने चीनकडून ही वैद्यकीय उपकरणे खरेदी केलीच का, असा सवाल भाजपने उपस्थित केला. शिवसेनेकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.