रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी BMC ने घेतला `हा` मोठा निर्णय
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नागरिकांना घरातच कोरोना टेस्ट करवून घेणे शक्य होईल. केवळ होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना ही सोय उपलब्ध असेल. एखाद्या होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली तर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी घरी जाऊन त्या रुग्णाचे नमुने (सॅम्पल्स) गोळा करतील. यानंतर हे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात येतील.
यासाठी आगामी दोन दिवसांत मुंबई महानगरपालिकेकडून स्वतंत्र हेल्पलाईनही सुरु करण्यात येईल. या हेल्पलाईनवर डॉक्टर होम क्वारंटाईन व्यक्तीची पूर्ण माहिती घेतील. यानंतर संबंधित व्यक्तीला कोरोना टेस्ट करायची किंवा नाही, याबाबत सल्ला दिला जाईल.
या सुविधेमुळे कस्तुरबा रुग्णालयासह मुंबईतील इतर रुग्णालयांवरील भार बराच हलका होऊ शकतो. तसंच एखादा कोरोनाबाधित रुग्ण अजाणतेपणे इतरांच्या संपर्कातही येणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनावरील उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालय हे प्रमुख केंद्र झाले आहे. कोरोना चाचणीची सर्वात मोठी सुविधाही याच रुग्णालयात आहे. त्यामुळे मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातील अनेकजण याठिकाणी गर्दी करत आहेत. अनेकजण केवळ सर्दी आणि खोकला असला तरीही भीतीपोटी कोरोनाच्या टेस्टसाठी रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे कस्तुरबामधील यंत्रणेवर प्रचंड ताण येताना दिसत आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईसह राज्यभरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू शकतो. याठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील आशा, अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.