प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : मुंबईत स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेले क्लिनअप मार्शल लूटमार करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. एका युवकाचं अपहरण करून त्याला मारहाण करत ८००० रूपये काढून घेण्यात आल्याची तक्रार करण्यात आलीय. घाटकोपरमध्ये गुन्हा नोंदवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर अंतर शर्मा या युवकाला रस्त्यात थुंकल्यामुळे क्लिनअप मार्शलनी हटकलं. त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची बतावणी करत दुचाकीवरून कुर्ल्यात नेण्यात आलं. तिथे त्याचे हातपाय बांधून एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याचं एटीएम कार्ड काढून घेतलं. तसंच युवकाकडे असलेले ८००० रूपये लुटण्यात आले. या घटनेनंतर घाटकोपर पोलीस ठाण्यात अपहरण, जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 



घाटकोपरमधली ही चौथी घटना आहे. या आधी झी २४ तासने स्टींग ऑपरेशन करून अशी घटना उघड केल्या आहेत. मागच्या आठवड्यात माणेकलाल सोसायटीकडूनही पैसे उकळण्यात आले होते. त्यामुळे खरंच हे क्लिनअप मार्शल आहेत की त्यांच्या वेशातले चोरटे हे शोधणं गरजेचं आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचे स्थानिक पवन राजपूत सांगतात. 


मुंबई स्वच्छ राहिली पाहिजे यात वादच नाही. मात्र स्वच्छतेच्या नावाखाली कोणी खंडणी उकळत असेल तर हा प्रकारही खपवून घेतला जाणार नाही.


पोलिसांनी अशा खंडणीबाजांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहेच पण मनपानेही क्लिन अप मार्शल्सवर योग्य ते नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.