मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : भारतात क्रीडा संघटनांवर राजकीय नेत्यांचं वर्चस्व पाहायला मिळते. देशातील सर्वोत्तम क्रीडा संघटनांपैकी एक असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेवरही (Mumbai Cricket Association) अनेक वर्षे राजकीय नेत्यांचे वर्चस्व राहिलेले आहे. मुंबई क्रिकेट संघटना आता पुन्हा एकदा राजकीय मंडळींच्या हातात जाणार अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई क्रिकेट संघटनेला भाजपाचा अध्यक्ष मिळणार ?
मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी शरद पवार 
(Sharad Pawar) गटाकडून अर्ज भरला होता. तर भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) हेदेखील दुसऱ्या पॅनलकडून अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र आता शरद पवार आणि आशिष शेलार गट एकत्र आले आहेत. तर संदीप पाटील यांच्या विरोधात हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या अर्जाला विरोध करण्याची तयारी काही मतदारांनी सुरू केली आहे.


यामुळे आशिष शेलार हे कदाचित बिनविरोध अध्यक्षपद पदावर निवडून येतील अशी अटकळ मुंबई क्रिकेट वर्तुळात बांधली जात आहे. मुंबई क्रिकेट संघटनेवर (MCA) आशिष शेलार यांच्या रुपात भाजपाचा (BJP) नेता विराजमान होऊ शकतो. यापूर्वी आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट संघटनेत उपाध्यक्षपद भूषवलेलं आहे. 


2011 ला वेंगसरकरांविरुद्ध देशमुख यांनी मारली होती बाजी
राजकीय हस्तक्षेपामुळे पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षस्थानापासून एकप्रकारे क्रिकेटपटूला दूर केले गेले आहे अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. यापूर्वी 2011 मध्ये माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. तेव्हाही दिलीप वेंगसरकर यांचा पराभव झाला होता तर विलासराव देशमुख यांनी बाजी मारली होती. आताच्या निवडणुकीत आता संदीप पाटील माघार घेणार की आशिष शेलार यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.