Mumbai Crime : मुंबईकरांची लाईफलाईन असेलली मुंबई लोकल (Mumbai Local) एका दिव्यांग व्यक्तीसाठी जीवघेणी ठरली आहे. धावत्या रेल्वेत एका गर्दुल्ल्याने दिव्यांग व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित व्यक्तीवर सध्या केईएम (KEM) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर लोकलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे धक्कादायक कृत्य करणाऱ्या आरोपीचा ठाणे रेल्वे पोलिसांकडून (Railway Police) सध्या शोध सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन कल्याणला जाणाऱ्या लोकल रेल्वेत हा हल्ला झाला. नशेसाठी वापरणाऱ्या सोल्युशनने दिव्यांग असलेल्या प्रवाशाला जाळण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपी गर्दुल्ल्याने दिव्यांग प्रमोद वाडेकर (अंदाजे वय 35) यांच्या हातावर नशेसाठी वापरले जाणारे सोल्युशनने टाकून माचिसने पेटवून दिले. या हल्ल्यात प्रमोद वाडेकर यांचा डावा हात संपूर्णपणे होरपळला असून त्यावर केईएममध्ये उपचार सुरू आहेत.


शनिवारी रात्री 10 : 45 ते 11 च्या सुमारास कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. हल्ला करणारा गर्दुल्ला दिव्यांगासाठी राखीव असलेल्या डब्यात बसला होता. त्यावेळी प्रमोद वाडेकर यांनी त्याला हटकले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात गुर्दुल्ल्याने प्रमोद वाडेकर यांच्या हातावर सोल्युशन टाकले आणि त्यानंतर माचिस लावून पेटवून दिले. या हल्ल्यात वाडेकर यांचा डावा हात होरपळाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पळून गेलेल्या संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसनी दिली आहे.


शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मुंब्रा स्थानक येताच पीडित व्यक्तीने दिव्यांग्यासाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये असलेल्या गर्दुल्ल्याला रस्तात बसल्यामुळे हटकले. पीडित व्यक्तीने मला उतरण्यासाठी जागा दे अशी विनंती केली. मात्र याचा राग गर्दुल्ल्याला आला आणि त्याने नशेसाठी वापरलं जाणारे सोल्युशन अंगावर फेकले आणि काडीपेटीने त्याला आग लावली. पीडित व्यक्तीला बोलता येत नसल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे पीडित व्यक्तीला कळवा रुग्णालयात नेल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे पीडित व्यक्तीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.