Mumbai News : मुंबईतील (Mumbai Crime) सत्र न्यायालयाने चित्रकार चिंतन उपाध्याय (Chintn Upadhyay) याला पत्नी हेमा उपाध्याय (Hema Upadhyay) आणि त्यांचे वकील हरेश भंभानी (Harish Bhambhani) यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. तर या प्रकरणातील अन्य आरोपी विजय राजभर, प्रदीप राजभर आणि शिवकुमार राजभर यांना दोघांच्या खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. हेमा उपाध्याय आणि वकील हरेश भंबानी यांची आठ वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात हेमा यांचे पती चिंतन उपाध्याय याला दोषी ठरवण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा उपाध्याय आणि हरेश भंभानी यांची 11 डिसेंबर 2015 रोजी हत्या झाली होती. मुंबईतील कांदिवली परिसरातील एका नाल्यात पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये दोघांचेही मृतदेह ३सापडले होते. त्यानंतर उपनगरीय दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.वाय. भोसले यांनी चिंतन उपाध्यायला त्याची पत्नी आणि तिच्या वकिलाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. प्रकरणाच्या सुरुवातीपासून मुंबई पोलिसांना यात कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा संशय होता. हेमाचे चिंतन उपाध्यायसोबत भांडण झाले होते. घटस्फोटाबाबत दोघांमध्ये कायदेशीर खटला सुरू होता. 


मात्र हेमा आणि तिच्या वकिलाच्या हत्येचा छडा लावू न शकलेल्या पोलिसांनी आपल्या वैवाहिक कलहाचा गैरफायदा घेतला आणि आपल्याला लक्ष्य करून याप्रकरणात गोवले. अटकेनंतर पोलिसांनी बळजबरीने आपला कबुली जबाब घेतला. त्यासाठी पोलिसांनी आपला अतोनात छळ केला असा दावा चिंतन उपाध्याय याने केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी विद्याधर राजभर हा अद्यापही याप्रकरणात फरारी आहे. मात्र हेमा हिच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून पोलिसांनी चिंतनला अटक केली होती. उपाध्याय याला वैवाहिक वाद संपवायचा होता. म्हणूनच त्याने हेमाच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप होता. याप्रकरणात चिंतन उपाध्यायने सहा वर्षे तुरूंगात घालवली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने उपाध्याय याला जामीन मंजूर केला होता. मात्र आता पुन्हा सत्र न्यायालयाने चिंतनला दोषी ठरवलं आहे.


नाल्यात फेकला मृतदेह


हेमा उपाध्याय आणि त्यांच्या वकिलाचा मृतदेह कांदिवलीतील नाल्यात सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यावेळी पोलीस राजभर नावाच्या व्यक्तीचा शोध घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजभर या व्यक्तीने हेमाला तिच्या माजी पती चिंतन उपाध्यायबद्दल माहिती असल्याचे सांगून भेटण्यासाठी बोलावले होते. यानंतर हेमा यांनी भेटण्यासाठी होकार दिला होता. मात्र त्याने वकिलालाही सोबत आणण्यास सांगितले होते. अशा रीतीने हेमा, तिचे वकील आणि राजभर यांची भेट निश्चित झाली होती. 


असा झाला उलघडा


पोलिसांनी चिंतन आणि इतर आरोपींमधल्या कॉलच्या रेकॉर्डचाही हवाला दिला होता. फिर्यादीच्या वकिलांनी कॉल डिटेल्स रेकॉर्ड सादर केले होते. वैवाहिक खटल्याला कंटाळून चिंतनने हेमाला संपवण्याचा कट रचला होता. याशिवाय, फिर्यादीच्या वकिलांनी प्रदीपच्या कबुली जबाबाचा हवाला देत सांगितले की, चिंतनने त्यांना हत्येसाठी 20 लाख रुपये देण्याचे वचन दिले होते.


फिर्यादी पक्ष प्रदीपच्या विधानावर खूप अवलंबून होता ज्यात प्रदीपने जयपूरहून हेमाला तिचा नोकर असल्याचे भासवून तिला  भेटण्याचे आमिष कसे दाखवले आणि तिला सांगितले की ते चिंतनविरुद्ध आपल्याकडे पुरावे आहेत. तसेच चिंतनने तुला दिलेले दोन लाख रुपये देखील पुरावा म्हणून वापरता येईल असे हेमाला सांगितले होते. वकील हरीश भंबानी यांची पत्नी पूनम भंभानी आणि तिची मुलगी हे हरीश हेमासोबत चिंतनविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी गेले होते. दुसरीकडे, विद्याधर राजभरची आई सावित्रीने असा दावा केला की विद्याधरने तिला खुनाच्या एका दिवसानंतर फोन केला आणि चिंतनच्या सांगण्यावरून हेमाला मारल्याचे सांगितले होते.


हेमा आणि तिच्या वकिलाचे मृतदेह कांदिवली परिसरात एका नाल्यात सापडले होते. दोन्ही मृतदेह पुठ्ठ्याच्या पेटीत भरलेले होते. पोलिसांनी तात्काळ दोन्ही मृतदेहांची ओळख पटवली होती. दरम्यान, हेमा यांनी 2013 मध्ये चिंतनविरोधात छळाचा गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात बंबानी हे त्यांचे वकील होते. हेमा पतीपासून वेगळ्या राहत होत्या. त्यांनी गुजरात ललित कला अकादमी आणि राष्ट्रीय ललित कला अकादमीचे वार्षिक पुरस्कार जिंकले होते. मानव संसाधन मंत्रालयाकडून त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली होते.


दरम्यान, चिंतनच्या शिक्षेबाबत शनिवारी न्यायालयात चर्चा होणार आहे. फिर्यादी पक्षाने आपल्या अंतिम युक्तिवादात चिंतन उपाध्याय हा त्याची पत्नी आणि तिच्या वकिलाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद केला आहे. चिंतन उपाध्याय या दोघांचा द्वेष करत असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील वैभव बागडे यांनी केला. दोषींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी करणार असल्याचे बागडे यांनी सांगितले.