Mumbai Women Killed Daughter Due To Love Affair: प्रेमप्रकरणाला आईचा विरोध असल्याने झालेल्या भांडणात मुलीने आईचं बोट तोडलं. त्यानंतर संपालेल्या आईने आपल्याच 19 वर्षीय मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथे घडली आहे. वांद्रे पूर्वेतील खेरवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी 40 वर्षीय टीना बागडे नावाच्या महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मलनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. पतीच्या निधनानंतर टीना नावाची ही महिला तिची मुलगी भूमिका आणि 2 मुलांबरोबर खेरवाडी येथील प्लॉट 80 मधील नथू गणपत चाळीत वास्तव्यास होती. कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या भूमिकाचे रोहित नावाच्या तरुणाबरोबर प्रेमप्रकरण सुरु होतं. टीनाला मुलीच्या नात्यासंदर्भात समजल्यानंतर तिने या नात्याला विरोध केला. यावरुन टीना आणि भूमिकामध्ये जवळपास दररोज वाद व्हायचे. सोमवारीही दोघींमध्ये असाच वाद झाला. सोमवारी हा वाद इतका विकोपाला गेला की भूमिकाने आईच्या हाताचा जोरात चावा घेतला. भूमिकाने घेतलेला चावा इतका जोरात होता की टीनाच्या बोटाचा तुकडाच पडला. संतापलेल्या टीनाने रागाच्याभरात भूमिकाचा गळा आवळला. याच झटापटीत श्वास कोंडल्याने भूमिकाचा मृत्यू झाला. 


गुन्हा लपवण्यासाठी खोटं बोलली, मात्र मृतदेहावरील व्रण पाहून पोलिसांना शंका


टीनाने फोन करुन तिच्या भावाला बोलावून घेतलं. भूमिकाला फिट आल्याचं टीनाने भावाला सांगितलं. यापूर्वी भूमिकाला फिटचा त्रास झाला होता. त्यामुळे टीनाने दिलेलं हे कारण भूमिकाच्या मामाला खरं वाटलं. भूमिकाला तातडीने व्हीएन देसाई रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. भूमिकाचा मृत्यू झाल्याने नियमांप्रमाणे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पंचनाम्यादरम्यान भूमिकाच्या शरीराव जखमांचे व्रण दिसून आले. भूमिकाच्या भुवयांजवळ आणि मानेवर पोलिसांना जखमा दिसून आल्याने सांगितलेल्या घटनाक्रमात काहीतरी तफावत असल्याने पोलिसांनी मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला.


अहवालानंतर झाला धक्कादायक खुलासा


पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये भूमिकाचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी टीना आणि तिच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर टीनाने आपला गुन्हा कबूल केला. ही घटना भूमिकाच्या लहान भावंडांसमोरच या दोघींचं भांडणं आणि झटापट झाली. मात्र टीनाने दोन्ही लहान मुलांना घडलेल्या घटनेबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही असा धमकी वजा इशारा दिला. मात्र पोलिसांनी या दोघांना धीर देत माहिती काढली असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितलं.


हत्येचा गुन्हा अन् अटक


मंगळवारी पहाटे टीनाविरोधात हत्याचे गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. कोर्टाने 16 मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या निर्लमनगर पोलीस स्टेशनअंतर्गत परिमंडळ 8 चे पोलीस आयुक्त दिक्षित गेडाम यांच्या देखरेखीखालील टीम या प्रकरणाचा तपास करत आहे.