प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : आयुष्यात मित्र हवेत मित्र नसतील तर आयुष्य अपूर्ण असतं असं म्हटलं जातं. पण मित्र निवडताना आपण आपली विवेकबुद्धी वापरून मित्र बनवायला हवेत. तुमची मित्रांची निवड चुकली तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर पडू शकतो. काही वेळा आपली निवड चुकते आणि वाईट, अप्रामाणिक, विश्वासघातकी मित्र आपल्या नशिबी येतात. याचीच प्रचिती देणारी एक घटना मुंबईतल्या (Mumbai) वसई (Vasai) भागात उघडकीस आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियकराच्या मदतीने मैत्रिणीच्या घरी चोरी
एका तरुणीने प्रियकरासोबत मिळून आपल्या मैत्रिणीच्याच घरी लाखो रुपयांची चोरी केली. या पैशातून त्या दोघांनी आयफोन, के टी एम ड्युक बाईक, फर्निचर, फ्रिज अशा महागड्या वस्तू खरेदी केल्या. पोलिसांनी या प्रकरणी हर्षिता गुप्ता आणि तिच्या अल्पवयनी प्रियकराला अटक केली असून खरेदी केल्या वस्तू आणि 30 हजार रुपये जप्त केल्या आहेत.


काय आहे नेमकी घटना
पीडित महिला ही वसईच्या एव्हरशाईन परिसरात राहते. या महिलेला घर खरेदी करायचं होतं, यासाठी तीने 8 लाख रुपये कॅश जमा केली होती. याची माहिती त्या महिलेने आपली मैत्रिण हर्षिता गुप्ता हिला दिली होती. इतकी मोठी रक्कम ऐकून हर्षिताची नियत फिरली. तीने आपल्या प्रियकराबरोबर मिळून चोरीचा प्लान आखला. त्यातच तीला आयती संधी चालून आली. पीडित महिला आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेली. याचाच फायदा उचलत हर्षिता आणि तिच्या प्रियकराने तिच्या घरी चोरी केली. 


कोणालाही संशय येऊ नये यासाठी हर्षित आणि तिच्या प्रियकराने दरवाजाचं कुलूप तोडलं. जेणेकरुन पोलिसांना सराईत गुन्हेगाराने ही चोरी केली असं वाटावं. पीडित महिला आणि तीचं कुटुंब जेव्हा घरी परतलं, तेव्हा त्यांना धक्काच बसला. इतर मौल्यवान सामानबरोबर घर खरेदी करण्यासाठी ठेवलेल आठ लाख रुपयेदेखील चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली.


पोलिसांसमोर होतं आव्हान
पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरु केला. पण त्यांच्या हातात काहीच पुरावा लागत नव्हता. परिसरातील जवळपास शंभर सीसीटीव्हीचं फुटेजही पोलिसांनी तपासलं. पण यानंतरही त्यांच्या हातात काहीच लागत नव्हतं. अखेर पोलिासांनी पीडित महिलेला घर खरेदी करणार असल्याची गोष्ट कोणाला सांगितली होती का याबाबत विचारणा केली. यावर पीडित महिलेने हर्षिता गुप्ताचं नाव सांगितलं.


चोरीचा असा लागला छडा
या एकाच पुराव्यावर पोलिसांनी हर्षिता गुप्ताची चौकशी सुरु केली. तिच्या राहणीमानात अचानक बदल झाला होता. चोरी झाली त्या दिवसानंतर हर्षिताने आयफोन, बाईक, फर्निचर अशा महागड्या वस्तू खरेदी केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी हर्षिताला ताब्यात घेतलं. सुरुवातीला हर्षिताने पोलिसांना दाद लागू दिली नाही. पण पोलीस खाक्या दाखवताच हर्षिताने आपला गुन्हा कबूल केला.