प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेला एका तरुणाचा मृतदेह पोलिसांनी बेवारस म्हणून किनाऱ्यावर पुरला होता. मात्र 15 दिवसांनी या मृतदेहाची ओळख पटली असून त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे  पुरलेला मृतदेह पोलिसांनी पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून कुटुंबियांच्या स्वाधीन केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदिवली इथं राहत असलेल्या दीपक कटकुर या 21 वर्षीय तरुणाचा हा मृतदेह असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या तरुणाचे एका मुलीसोबत  प्रेमसंबंध होते या वादातून त्याचाच मित्र सुरज विश्वकर्मा याने 12 मे रोजी त्याची हत्या करून दीपकचा मृतदेह भाईंदर खाडीत फेकून दिला होता. त्यानंतर दीपकचा मृतदेह 2 दिवसांनी म्हणजे 14 मे ला भुईगाव समुद्र किनाऱ्यावर लागला होता. पोलिसांनी बेवारस म्हणून दीपकचा मृतदेह जमिनीत पुरला.


कांदिवली पोलीस ठाण्यात दीपक हरवला असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत असताना प्रेमसंबंधातून दीपकची हत्या केल्याची कबुली आरोपी सुरज विश्वकर्मा याने पोलिसांना दिली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.


त्यानंतर बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी दीपकचा पुरलेला मृतदेह पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून त्याच्या कुटूंबियांच्या स्वाधीन केला आहे..