Mumbai Crime : मुंबईतील (Mumbai News) कांदिवली (kandivali) पश्चिम येथील धनुकरवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरील गटाराची साफसफाई (Drain cleaning) करत असताना एका मजुराचा कारने चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सफाई करत असतानाच अंगावरुन गाडी गेल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. जगवीर शामवीर यादव (37) असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. जगवीर हा उत्तर प्रदेशच्या (UP) बदायूं जिल्ह्यातील रहिवासी होता. महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगवीर आणि त्याचा साथीदार गटार साफ करत असतानाच हा अपघात झाला आहे. तसेच तिथल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे हा सर्व प्रकार कैद झाला आहे. जगवीर गटारात उतरून सफाईचे काम करत होता. त्याचवेळी त्याचा साथीदार काहीतरी ठेवण्यासाठी तिथून थोडा दूर गेला. त्यानंतर एक स्विफ्ट गाडी जगवीरच्या अंगावर आली. त्यानंतर चालकाने कार थोडी मागे घेतली. तितक्यात लोकांनी जगवीरला बाहेर काढलं.


हा सर्व प्रकार तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी आणि मजूरांनी पाहिला. त्यांनी जगवीरला तात्काळ बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी कार मालक आणि जगवीर यादवला कामावर ठेवणाऱ्या कंत्राटदाराला अटक केली आहे.



गोवंडीत दोन मजुरांचा मृत्यू


दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मलनिस्सारण वाहिनीच्या मॅनहोलमध्ये सफाईचे काम करत असताना दोन कामगारांचा गोवंडी येथे मृत्यू झाला होता. रामकृष्ण (25) आणि सुधीर दास (30) अशी मृत मजुरांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. गोवंडीच्या शिवाजी नगर बस आगाराच्या बाजूला शनिवारी संध्याकाळी चार वाजता हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. बस आगाराच्या बाजूला खासगी कंत्रादाराकडून मलनिस्सारण वाहिनीच्या सफाईचे काम सुरू होते. त्याचवेळी रामकृष्ण आणि सुधीर दास हे गटारात पडले. इतर कामगारांनी त्यांना बाहेर काढून  रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.