अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतून (Mumbai Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. मुलुंडमध्ये एका महिलेने स्वतःच्या 39 दिवसांच्या पोटच्या मुलीला इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन फेकल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. इमारतीवरुन खाली फेकल्यानंतर ही चिमुकली एका दुकानावर पडली होती. सकाळी हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. वडिलांच्या निधनाने मानसिक तणावात असलेल्या मुलीने तिच्या मुलीची अशा प्रकारे हत्या केल्याने कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी (Mumbai Police) अद्याप महिलेला अटक केलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलुंडच्या निळकंठ अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. मनाली मेहता ही महिला सुरतहून मुलुंडमध्ये आपल्या माहेरी आली होती. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. मनाली हिची 39 दिवसांची मुलगी हाश्वी हिच्यावर तिच्या वडिलांचा जीव होता. त्यामुळे हाश्वीला पाहताच तिला तिच्या वडिलांची वारंवार आठवण येत होती. मनाली आपल्या वडिलांच्या निधनामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती. हाश्वीला तिचे आजोबा बोलवत आहेत अशी मनाली कुटुंबियांना सारखी सांगायची. मात्र कुटुंबियांनी तिची समजूत काढली.


मात्र बुधवारी रात्री तिने वारंवार कुटुंबीयांना पुन्हा हाश्वीला बाबा बोलवत आहेत असे सांगायला सुरुवात केली. मात्र तिच्या कुटुंबीयांनी याकडे लक्ष दिले नाही आणि झोपायला गेले. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मनालीने चौदाव्या माळ्यावरील बेडरूमची खिडकी उघडली आणि तिथून तिच्या 39 दिवसांच्या हाश्वी या चिमुकलीला खाली फेकून दिले. ही मुलगी इमारतीच्या खाली असलेल्या एका दुकानाच्या छतावर पडली होती.


सकाळच्या वेळी इमारतीतील एका रहिवाशाने दुकानाच्या छतावर एका लहान मुलीचा मृतदेह पडला असल्याचं पाहिलं. त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी घेऊन मुलीचा मृतदेब ताब्यात घेतला आणि परिसरात चौकशी सुरु केली. चौकशी करत असताना हे मूल मनालीचे असल्याचं समोर आलं. पोलिसांनी मनालीच्या घरी जाऊन चौकशी सुरु केली.


दरम्यान, वडिलांच्या मृत्यूमुळे मनाली ही प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचं तसेच तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचा पोलिसांच्या निदर्शनास आलं. तपासानंतर मनालीनेच मुलीला इमारतीवरुन खाली फेकल्याचे समोर आलं. पोलिसांनी याप्रकरणी मनालीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मनालीच्या वैद्यकीय उपचारांमुळे तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.