आर्यन खान खोटं बोलतोय! `त्या` आरोपांवर अनन्या पांडेने केला खुलासा
Mumbai Drugs Case आर्यन खान आणि अनन्या पांडे दरम्यानच्या व्हॉट्सअॅप चॅटवर खुलासा
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (NCB) नुकतंच न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Pandey) नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (NCB) ला दिलेल्या जबानीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तिने दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, आर्यन खानने तिला गांजा दिल्याचं त्याने खोटं सांगितलं.
तिने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन सोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल आणि 2019 मध्ये त्यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट्सबद्दल विस्तृतपणे सांगितलं. एनसीबीला दिलेल्या निवेदनात आर्यनने आरोप केला होता की, त्याने अनन्याला गांजा दिला होता. मात्र, अनन्याने आर्यनचे हे विधान खोटे ठरवले आणि म्हटले की, तो याबाबत खोटे का बोलत आहे, तो का खोटं बोलला याबाबत आपल्याला काही माहिती नाही.
आर्यनने गेल्या वर्षी एनसीबीला दिलेल्या जबाबात म्हटले होते की, "अनन्याला एक लहान बहीण आहे जिला अनन्याने गांजासह पकडलं होतं. त्यावेळी ती सुमारे 15-16 वर्षांची होती. ती नियमित धूम्रपान करणारी नव्हती. तिच्या पालकांना हे कळू नये असं तिला वाटत होते, म्हणून तिनं मला विल्हेवाट लावण्यासाठी गांजा दिला आणि मी तसं केलं."
अनन्याने सांगितले की ती आणि आर्यन लहानपणापासून मित्र होते कारण त्यांचे आई-वडीलही मित्र होते. ती म्हणाली, 'आम्ही 2019 पर्यंत जवळचे मित्र होतो, पण त्यानंतर आम्ही दोघेही आमच्या कामात गुंतलो आणि वेगळे झालो. तरीही आम्ही संपर्कात असतो आणि अधूनमधून बोलत असतो'
'मी कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही'
'मी कधीही कोणालाही अंमली पदार्थ दिलेले नाहीत. मी कधीही कोणाला ड्रग्ज किंवा पैसे देण्याची ऑफर देखील दिली नाही. मी अंमली पदार्थाच्या व्यवसायात नाही. मी कोणत्याही ड्रग डीलरला ओळखत नाही' असं अनन्याने आपल्या जबानीत म्हटलं आहे.
अनन्या पुढे म्हणाली की तिची बहीण 2020 पर्यंत नुसत्या तंबाखूचे सेवन करत होती. पण ती कधीही ड्रग्सच्या आहारी गेली नाही. अनन्या पुढे म्हणाली की तिची बहीण तिच्या तंबाखुच्या व्यसनासाठी आणि अशा समस्यांसाठी मानसशास्त्रज्ञांना भेट देते. अनन्याने यावर जोर दिला की "मी कधीही कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सेवन केलेले नाही. मात्र मी अधूनमधून सिगारेट ओढते आणि कधीकधी मी वाईन किंवा बिअर पिते."
तो एक विनोद होता !
ती पुढे म्हणाली, "आर्यनने जबानीत सांगितलं की तो माझ्याकडून गांजा गुपचूप घेत होता. मात्र तो विनोद करत होता. प्रत्यक्षात असं काहीही घडलं नाही. तर पैशांबाबतचे चॅट हे नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी आणि टेबल बुक करण्याबाबत होतं." मात्र अनन्याने हे कबूल केले की तिने आणि आर्यनने एकत्र दारू आणि सिगारेटचे सेवन केले होतं परंतु कधीही ड्रग्स घेतले नव्हतं.