मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना आर्यन खानसह 6 प्रकरणावरुन हटवण्यात आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून आरोपांची मालिका सुरुच आहे. या वादात आता समीर वानखेडे यांच्या मेहुणीची एंट्री झाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्ज व्यवसायात गुंतलेली आहे का? असा संशय नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज एक ट्वीट केलं आहे. आणि नव्या वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडेंना सवाल केला आहे. समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या त्याचा पुरावा असं म्हणत ई कोर्ट सर्व्हिसेसवरील काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. नवाब मलिक यांनी म्हटलं की, ती महिला कोण तिच्याशी समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. 



क्रांती रेडकर यांचं जशात तसं उत्तर


नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. यासंदर्भात क्रांती रेडकर हिने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तीने म्हटलं आहे, नवाब मलिक यांच्या ट्विट नंतर प्रसारमाध्यमांना अनेक प्रश्न पडले आहेत, मला सांगावसं वाटतं की माझ्या बहिणीला या प्रकरणात सातत्याने लक्ष्य केलं जात आहे, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आमच्या लीगल टीमच्या सांगण्यानुसार त्यावर आता मत देणं योग्य होणार नाही, माझी बहिण कायदेशिररित्या नवाब मलिक यांच्या ट्विटला उत्तर देईल, तसंच या प्रकरणाशी समीर वानखेडे यांचा काहीही संबंध नाही, असं क्रांती रेडकरने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.



समीर वानखेडे यांचा खुलासा


मलिक यांनी आरोप केल्यानंतर समीर वानखेडे यांनी तात्काळ खुलासा केला आहे. मी त्यावेळी एनसीबीच्या नोकरीतही नव्हतो मग त्याचा काय संबंध?, असा सवाल उपस्थित करत समीर वानखेडे यांनी मलिक यांच्यावर पलटवार केला आहे. 


'हर्षदा रेडकर यांच्या विरुद्धच्या प्रकरणाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. ही केस जानेवारी 2008 ची आहे. या प्रकरणानंतर 9 वर्षांनी, म्हणजेच 2017 साली क्रांती सोबत माझं लग्न झालं. शिवाय, 2008 साली मी NCBच्या सेवेतही नव्हतो. मग त्या प्रकरणाशी माझा संबंध कसा असू शकतो? यात विनाकारण माझं नाव गोवलं जात आहे, असं वानखेडे यांनी म्हटलं आहे.