Mumbai News Today: मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका इसमाने स्वतःच्याच घरी गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी या इसमाला अटक केली आहे. मात्र, निवासी इमारतीत गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, घरातच गोळीबार झाल्याने अग्नीशमन दलानेदेखील घटनास्थळी धाव घेतली आहे. (Mumbai Crime News) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील दिंडोसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीबी वुड बिल्डिंगच्या बी विंगमध्ये एका व्यक्तीने स्वत:ला घरात कैद करून घेतले असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली होती. अग्निशमन दलाने ही माहिती पोलिसांनाही देण्यात आली. या व्यक्तीने स्वतःला कोंडून घेतले असताना दारूच्या नशेतच परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून घरातच गोळीबार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. 


दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:ला खोलीत कोंडून घेतलेल्या व्यक्तीने खोलीच्या आतून आपल्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. सुदैवाने त्या कुटुंबातील कोणालाही दुखापत झालेली नाहीये. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजू रंजन असून तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. 


अग्निशमन दलाच्या पथकाने डीबी वुड बिल्डिंगमधून राजू रंजनची सुटका करून त्याला दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सध्या राजू रंजनला दिंडोशी पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून तो पूर्णपणे दारूच्या आमलाखाली असल्याचे दिसून येत आहे. तसंच, राजू रंजनने घेतलेला गोंधळ पाहून पोलिसांनी त्याच्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पण या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून गोळीबाराच्या आवाजाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


पुण्यात पत्नीचा पतीवर हल्ला


जेवण वाढताना वाद झाल्यामुळं महिलेकडून पतीवर चाकूने वार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चक्क चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया रमेश ससाणे (वय ३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर, या बाबत तिचा पती रमेश बबन ससाणे (वय ४३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 500 रुपयांवरुन दोघांत वाद झाल्याने ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.