मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा ईडी (ED) कोठडीतला मुक्काम आणखी तीन दिवसांनी वाढला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने 31 तारखेला रात्री उशीरा अटक केली होती. यानंतर 1 ऑगस्टला संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आलं यावेळी त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावणी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज कोठडीची मुदत संपत असल्याने संजय राऊत यांना पुन्हा विशेष PMLA कोर्टात हजर केलं. आज कोर्टाने त्यांना पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 


संजय राऊत यांनी मागितली नॉन-एसी रूम 
न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी संजय राऊत कोर्टात हजर होताच ईडीकडून काही त्रास होत आहे का याबाबत विचारणा केली. यावर संजय राऊत यांनी आपल्याला हवेशीर रूममध्ये ठेवले नसल्याची तक्रार न्यायाधीशांकडे केली. तसंच रूममध्ये काहीही व्यवस्था नसल्याची तक्रारदेखील त्यांनी केली. 


यावर न्यायाधीश देशपांडे यांनी हे गंभीर आहे. यावर काय कार्यवाही करणार अशी विचारणा ईडीला केली. यावर ईडीने आधी दिलगिरी व्यक्त केली. सर्व इमारत एसी असून संजय राऊत यांची रूमही एसी असल्याची माहिती ईडीने कोर्टात दिली. यावर संजय राऊत यांनी आपल्याला एसीचा त्रास होत असल्याचं सांगितले. 


न्यायाधीशांनी नैसर्गिक हवा असलेली आणि फॅन असलेली रूम द्यावी असं इडीला सांगितलं. त्यानंतर संजय राऊत यांना तुम्ही समाधानी आहात का अशी विचारणीा केली असता संजय राऊत यांनी हो असं उत्तर दिलं. आता संजय राऊत यांच्याच मागणीनुसार त्यांना नॉनएसी रूममध्ये ठेवण्यात येणार आहे.


काय आहे पत्राचाळ प्रकरण? 
गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचा म्हाडासोबत करार
पत्राचाळीच्या ठिकाणी 3 हजारांहून अधिक फ्लॅट बांधायचे होते
एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते
उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरूआशिषकडे राहणार होते
बांधकाम न करता गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसणूक
गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1 हजार 34 कोटींना दुसऱ्या बिल्डरला विकली