मुंबईमध्ये सगळ्यात महागडी घर विक्री
वाढत्या महागाईमुळे घर घेणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे.
मुंबई : वाढत्या महागाईमुळे घर घेणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. पण मायानगरी मुंबईमध्ये सगळ्यात महागड्या घरांची विक्री झाली आहे. एका व्यापारी कुटुंबानं मुंबईमध्ये ४ फ्लॅट २४० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. त्यामुळे एका घराची किंमत ६० कोटी रुपये एवढी आहे. सध्या हे फ्लॅट सगळ्यात महाग असल्याचं बोललं जातंय. पण दोन ते तीन वर्षांआधी याआधीही यापेक्षा महाग घरांची विक्री करण्यात आली होती. पण आत्ताच्या दोन ते तीन वर्षातली ही सगळ्यात महागडी घर विक्री आहे.
तपारिया कुटुंबानं विकत घेतले फ्लॅट
एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार नेपिअन सी रोडवरच्या द रेसिडेंस टॉवरमध्ये २८वा ते ३१ व्या मजल्यावरचे ४ फ्लॅट रुनवाल ग्रुपच्या तपारिया कुटुंबानं विकत घेतले आहेत. तपारिया परिवाराकडे गर्भनिरोधक निर्माता फॅमी केअरची मालकी होती. याला त्यांनी तीन वर्षांपूर्वी जवळपास ४,६०० कोटी रुपयांना विकलं.
१.२ लाख रुपये स्क्वेअर फूट
मुंबईतल्या लक्झरी टॉवरमधले हे फ्लॅट १.२ लाख रुपये प्रती स्क्वेअर फुटाला विकले गेले आहेत. या प्रत्येक फ्लॅटचा एरिया ४,५०० हजार स्क्वेअर फूट एवढा आहे.
पब्लिक नोटीस काढून दिली माहिती
तपारिया कुटुंबाची लिगल फर्म वाडिया गांधींनी बुधवारी एक पब्लिक नोटीस काढून रुनवाल ग्रुपकडून ही खरेदी झाल्याची माहिती दिली. तपारिया कुटुंबानं फ्लॅट खरेदीसोबतच २८ कार पार्किंगही विकत घेतलं आहे. दोन वर्षांपूर्वी तपारिया कुटुंबानं ६० कोटी रुपयांना ११ हजार स्क्वेअर फूटाचा डुप्लेक्स फ्लॅट विकत घेतला होता. मुंबईतल्या बीकेसीमध्ये हा फ्लॅट आहे.
ही पण आहे सगळ्यात मोठी विक्री
२०१५ साली जिंदाल परिवारानं अलटामाऊंट रोडवर लोढा अलटामाऊंटमध्ये दहा हजार स्क्वेअर फुटाचा डुप्लेक्स फ्लॅट १६० कोटी रुपयांना विकत घेतला होता. २०१५ मध्येच उद्योगपती क्रूयस पूनावाला यांनी ७५० कोटी रुपयांची डील केली होती.
२०१५ मध्ये पटनी कंप्यूटर्सनं नेपिअन सी रोडवर २०० कोटी रुपयांना ३ फ्लॅट विकत घेतले होते. इन्फोसिसचे सह संस्थापक नंदन निलेकनी यांनी वरळीमध्ये सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये फ्लॅट विकत घेण्यासाठी २२.५ कोटी रुपये मोजले होते.