तुम्ही खात असलेली फळं कचरापेटीतील? मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा घाणेरडा प्रकार
Mumbai : चांगल्या आरोग्यासाठी फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्ही बाजारातून घेत असलेली फळं कोणत्या ठिकाणी ठेवली जातात हे तुम्हाला माहित आहे का. मुंबईतल्या पॉश परिसरात फळं चक्क कचरापेटीत ठेवली जात असल्याचं समोर आलं आहे.
कपिला राऊत, झी मीडिया, मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी फळं ( Fruits) ही फायदेशीर असतात, जंक फूड पेक्षा दररोज एक फळं खा असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. इतकंच काय तर कोल्ड्रींग पिण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या ज्यूस गाडीवरुन आपण ज्यूस पितो. पण तुम्ही बाजारातून विकत घेत असलेली फळं किंवा ठेल्यावर ज्यूस बनवण्यासाठी वापरण्यात येणारी फळं कोणत्या ठिकाणी ठेवली जातात हे तुम्हाला माहित आहे का? मुंबईतील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुंबईकरांच्याज जीवाशी खेळण्याचा घाणेरडा प्रकार सुरु आहे.
तुम्ही कचरा पेटीतील तर फळे खात नाही ना?
तुम्ही कचरा पेटीतील तर फळं खात नाही ना असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून उपस्थित होतोय. मुंबईतील पॉश समजल्या जाणाऱ्या कुलाबा (Colaba) इथल्या प्लाझा मार्केटमधला (Plaza Market) हा व्हिडिओ आहे. रस्त्यावरील कचरा गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कचरा पेटीत फळं ठेवली जात असल्याचं समोर आलं आहे. कुलाब्यातील गेटवे प्लाझा हा परिसर नेहमी गजबजलेला असते. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या अनेक गाड्या आहेत. यात फ्रूट सलाड आणि ज्यूसच्याही गाड्या आहेत. या गाड्यांवर अनेक लोकं खरेदी करतात. पण लोकांच्या जीवाशी अक्षरश खेळ सुरु आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
एका जागरुक नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये हा किळसवाणा प्रकार कैद केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकाची गाडी कारवाई करण्यासाठी याठिकाणी येते त्यावेळी हे फेरीवाले आपली फळ आणि भाजी वाचवण्यासाठी कचऱ्याच्या डब्यात लपवतात. त्यानंतर महानगरपालिकाची गाडी निघून गेली की या कचऱ्याच्या डब्यामध्ये फळ काढून विक्री पुन्हा करण्यात येते.