तिरूवअनंतपुरम: केरळ येथे आलेल्या महापूरात अतोनात नुकसान झाले आहे. या महापूरानंतर रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्राने मदतीचा हात पुढे केला आहे. महाराष्ट्राच्या वतीने केरळला १०० जणांचे पथक वैद्यकीय मदत घेऊन पाठविण्यात आले आहे. मदत कार्यात कोणतीही कसर राहू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन स्वत: या पथकासोबत मुंबईहून निघाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे, मुंबई येथील डॉक्टर आणि त्याची टीम भारतीय हवाई दलाच्या दोन विमानातून केरळला निघाले आहेत. जर अधिक मदत लागल्यास दुसरी टीम ही तयार करत आहोत आणि ती ही लवकरच निघेल असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. महाराष्ट्राकडून केरळला पाठविण्यात आलेल्या मदतीत जवळपास ६.५ टन मदतसामग्री रविवारी संध्याकाळी जहाजातून रवाना करण्यात आली. तर, आज राज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री पाठविण्यात आली.



केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा पुढाकार घेतला असून, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मदत पाठविण्यात आली आहे. त्यात अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट, बेडशीट्स, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादींचा समावेश असून, केरळ सरकारने मागितलेल्या निकडीच्या बाबी यात प्राधान्याने पाठविण्यात आल्या आहेत.