Mumbai News : मुंबईत घर घेण्यासाठी अनेकांचेच प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळतं. व्यावसायिक असो, एखादा धनाढ्य असो किंवा अगदी नोकरदार वर्गातील कोणी असो. आपल्या मिळकतीनुसार शहरात घर खरेदी करण्याचा अनेकांचाच प्रयत्न असतो. पण, आता मात्र या मायानगरीमध्ये घर खरेदी करण्याच्या स्वप्नाचा विचारही न करणंच योग्य असेल. कारण, म्हणजे घरांचे वाढते दर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Mumbai Real Estate बाजारात आलेल्या तेजीमुळं आता शहरातील गृहबांधणी प्रक्रियेमध्ये कमीत कमी 6 टक्के दरवाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बांधकाम क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या JLL कंपनीकडून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात आला आहे, जिथं ही माहिती पुरवण्यात आली. 


शहरातील घरांच्या बांधकामांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सिमेंट, वाळू, विटा या आणि अशा सामग्रीच्या विक्रीदरातही वाढ झाली आहे. शिवाय मजुरीचेही दर वाढल्यानं प्रत्यक्षात गृहबांधणीसुद्धा महागत चालली आहे. कच्च्या सामानाच्या किमती सातत्यानं वाढतच चालल्यानं याचे पडसाद नव्यानं तयार घरांच्या किमतींवरही होताना दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


शहरात किती घरांची विक्री? 


सदर अहवालानुसार 2023 या वर्षात मुंबई शहरात जवळपास 1.50 लाख मालमत्तांची विक्री नोंदवण्यात आली. यामध्ये 80 टक्के मालमत्ता घरांच्या स्वरुपात असून, उर्वरित 20 टक्के मालमत्ता व्यावसायिक असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, घरांच्या या आकड्यामध्ये 5 कोटी आणि त्याहून अधिक किंमत असणाऱ्या घरांचं प्रमाण 15 टक्के इतकं होतं असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं. 


हेसुद्धा वाचा : म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार? 


एकिकडे गृहबांधणीचे दर वाढत असतानाच दुसरीकडे या क्षेत्रानं अनेकांना रोजगार दिल्याचंही स्पष्ट झालं आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये देशातील एकूण बांधकाम क्षेत्रानं 7 कोटी 10 लाखांहून अधिकांना रोजगार दिला होता. बांधकाम क्षेत्रानं एकिकडे अनेकांना आर्थिक सुबत्ता दिली असली तरीही मुंबईतील घरांच्या दरवाढीमुळं अनेकांनीच घर खरेदीच्या स्वप्नापासून दुरावा पत्करला हे खरं.