म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?

Mhada, Cidco Housing Lottery : स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल. खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार म्हाडा आणि सिडकोचं घर. पाहून घ्या सविस्तर वृत्त...   

सायली पाटील | Updated: Apr 24, 2024, 09:00 AM IST
म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?  title=
Cidco to launch housing projects like mhada sleares md vijay singhal latest update

Mhada, Cidco Housing Lottery : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांसाठीच म्हाडा आणि सिडकोच्या वतीनं राबवण्यात येणारी गृहप्रकल्प मोठ्या मदतीचे ठरतात. खिशाला परवडणाऱ्या दरात आणि कर्जाचा फार बोजा न देता सामान्यांना शहरात किंवा शहराला  लागूनच असणाऱ्या क्षेत्रांमध्ये विविध सोयीसुविधांसह ही घरं उपलब्ध करून दिली जातात. अशाच घरांच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता म्हाडा आणि सिडकोच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत, ज्याचा फायदा घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांनाच मिळणार आहे. 

सोडतीत समाविष्ट असणारी आणि विक्रीविना उपलब्ध असणारी घरं आता म्हाडाकडून मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीसह इच्छुकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणा आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाच्याच पावलावर पाऊल ठेवत आता सिडकोनंही सोडतीव्यतिरिक्त विविध प्रकल्पांमधील उर्वरित घरांच्या विक्रीसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. परिस्थितीचा यथासांग विचार करून याबाबत पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती सिडकोच्याच व्यवस्थापकीय संचालकांनी एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाशी संवाद साधताना दिली. 

हेसुद्धा वाचा : पाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं नामकरण, नवं नाव 'भाकड...'

 

घर खरेदीत मिळणार सवलत? 

विरार येथे म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळपास 5 हजार घरं विक्रीसाठी उपलद्ध आहेत. अशा परिस्थितीत एकाच वेळी 100 घरांची नोंदणी करण्यास समर्थ असणाऱ्या शासकीय अथवा खासगी संस्थांना घरांच्या दरात 15 टक्क्यांनी सवलत देण्यात येणार आहे. म्हाडाप्रमाणं आता सिडकोकडूनही प्रकल्पातील सोडतीतून उरलेल्या घरांची याच धर्तीवर विक्री करण्यासाठीची तयारी केली जात आहे. 

 साधारण गेल्या 4 वर्षांमध्ये सिडकोच्या वतीनं नवी मुंबईतील विविध भागांमध्ये जवळपास 25 हजारांहून अधिक घरं उभारली. पण, त्यातील 8 हजार घरांची विक्री मात्र अद्याप झालेली नाही. भविष्यातील प्रकल्पांसाठी विविध उप्तन्न गटांच्या अनुषंगानं सिडकोकडून 86 हजार घरांचं बांधकाम हाती घेण्यात आलं असून, त्यापैकी 40 हजार घरांचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात असूनही सिडकोच्या या घरांना मिळणारा प्रतिसाद मात्र काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.