मुंबई  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनाबाहेरील पाटी आता बदलण्यात आलेली आहे. शासनाने वडिलांच्या नावासोबत आईचे नाव (Mother Name) लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करत यापुढे शासकीय दस्तऐवजावर यापुढे वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता .या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून करायची असं ठरवलं होतं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते आता 'एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे' असे करण्यात आलं आहे.


माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचं महत्त्व देखील अधोरेखित व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरु केली आहे.


धनंजय मुंडेंच्या नावाची पाटीही बदलली
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी केली असून त्यांनी आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावाआधी आईचे नाव असलेली पाटी आपल्या मंत्रालयातील दालनामध्ये लावली आहे. त्यामुळे आता धनंजय यांचे संपूर्ण नाव 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' असे नाव असणारी पाटी आता मंत्रालयात लावण्यात आली आहे. 


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसंच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून राज्याचे चौथं महिला धोरण नुकतेच घोषित करण्यात आलं. या महिला धोरणामध्ये स्त्री-पुरुष समानतेला विशेष महत्त्व देण्यात आलं असून आईचं आयुष्यातील स्थान देखील अधोरेखित करण्यात आलं आहे. 


त्यामुळे आता नव्या धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये आपले संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा नव्याने सुरू करण्यात आली असून याची अंमलबजावणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयीन दालनात 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' अशा नावाची लावण्यात आली आहे.