मुंबई विमानतळ सोने तस्करीचा अड्डा, अकरा महिन्यात तब्बल `इतक्या` कोटींचं सोनं जप्त
देशाची आर्थिक राजधानी ही मुंबईची ओळख. मुंबईला भारताची व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानीसुद्धा म्हटलं जातं. मुंबई आणखी एका क्षेत्रातही अव्वल ठरलीय. मात्र ही ओळख मुंबईला बदनाम करतेय. कारण मुंबई विमानतळ बनलंय तस्करीचा अड्डा.
मुंबई : कधी चपलेतून सोन्याच्या बिस्किटची तस्करी, कधी साडीतून नोटांची तस्करी, कधी मास्कमधून सोन्याचं स्मगलिंग (Gold Smuggling) तर कधी बुटात लपवलेलं सोनं. अशी तस्करी परदेशात नव्हे तर चक्क मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) सुरु आहे. सध्या मुंबईचं विमानतळ तस्करीचा मोठा अड्डा बनलंय. आताही मुंबई विमानतळावर सोनं तस्करी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला रंगेहाथ पकडण्यात आलंय. महसूल गुप्तचर संचालनालयानं (Directorate of Revenue Intelligence) मोठ्या स्मगलिंग सिंडिकेटचा पर्दाफाश केलाय. बुटांमध्ये मेणात हे सोनं लपवण्यात आलं होतं. 7 किलो 400 ग्रॅम वजनाच्या या परदेशी बनावटीच्या सोन्याची किंमत 4 कोटी 51 लाख रुपये आहे..
मुंबई विमानतळावर सोने तस्करी
छोट्या पॅकेटमध्ये मेणात सोनं लपवलं जायचं. सोन्याची ही पाकिटं विमानात सीटवरच सोडली जायची. खासगी विमान कंपनीचा स्टाफ ही पाकिटं विमानतळाबाहेर आणायचे. एका तस्करीसाठी स्टाफला 50 हजार रुपये मिळायचे. तस्करीतून हा स्टाफ महिन्याला 4 लाख रुपयांची कमाई करायचा.
या टोळीत एका खासगी विमान कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर मुंबईच्या काळबादेवीतल्या कुरिअर सर्व्हिस सेंटरच्या दोघांचा समावेश आहे. या टोळीची मोडस ऑपरेंडी अधिकाऱ्यांनाही नवीनच होती. मुंबई विमानतळ गेल्या काही वर्षांपासून सोनं तस्करीचा अड्डाच बनलाय. देशात मुंबई विमानतळाचा सोने तस्करीत पहिला क्रमांक लागलोय.
मुंबई सोनं तस्करीचा अड्डा
मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने 11 महिन्यांमध्ये 360 कोटींचं 604 किलो तस्करी केलेलं सोनं जप्त केलंय ऑक्टोबर 2022 पासून मुंबईत सोन्याची तस्करी करताना 20 पेक्षा जास्त परदेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय तस्करी करण्यात विमान कर्मचाऱ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात वाढलाय. तस्करीतून मिळणाऱ्या झटपट पैशांच्या मोहापायी ते तस्करांच्या जाळ्यात अलगद सापडतायत. गेल्या तीन वर्षात 58 विमान कर्मचाऱ्यांना तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलीय.
सोन्याच्या तस्करीची भरारी
भारतात परदेशातून पुरुषांना 20 ग्रॅम तर महिलांना 40 ग्रॅम सोनं आणण्याची परवानगी आहे. ज्वेलर्सच्या माहितीनुसार भारतात एकूण 720 टन सोनं दरवर्षी येतं. 380 टन कायदेशीररित्या तर 340 टन सोनं तस्करीमार्गे येत असल्याचा दावा आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते भारतात मौल्यवान धातूंची तस्करी 160 टनांवर पोहोचली आहे. आयात शुल्क 7.5 वरुन 12.5 टक्के केल्याने तस्करी वाढल्याचा दावा वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने केलाय.
कोरोनाकाळ संपल्यानंतर सोन्याच्या तस्करीनेही भरारी घेतलीय. विशेष म्हणजे कस्टम विभागाला चकमा देण्यासाठी प्रत्येक वेळी आरोपी नवनव्या पद्धतीचा अवलंब केला जातो. मात्र कस्टम विभागाचे अधिकारीही तस्करांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. तरीही सोन्याची तस्करी रोखण्याचं मोठं आव्हान मुंबई विमानतळावरच्या अधिकाऱ्यांसमोर आहे..