राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसमुळे ३ मेपर्यं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लॉकडाऊन वाढवल्यानंतरही वांद्रे स्टेशनवर मंगळवारी हजारो लोकं एकत्र आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे स्टेशनवर जमलेल्या लोकांपैकी काहींनी ट्रेन सुरू व्हायची अफवा पसरल्याचं सांगितलं, पण मुंबई पोलिसांना आतापर्यंत ट्रेन सुरू होण्याची खरंच अफवा पसरवली गेली होती का? याचा पुरावा मिळालेला नाही. पोलिसांनी काही जणांची चौकशी केली, त्यामध्ये ट्रेन सुरू व्हायच्या अफवेचा कोणताही एसएमएस किंवा व्हॉट्सऍप मेसेजही आढळलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रे स्टेशनवर जमलेले मजूर हे उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याचं सांगण्यात आलं, पण उत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठीच्या ट्रेन सीएसएमटी, दादर आणि एलटीटीवरून सुटतात. तर गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या ट्रेन वांद्रे टर्मिनसवरून सुटतात. वांद्रे टर्मिनस हे वांद्रे रेल्वे स्टेशनपासून १ ते २ किमी अंतरावर आहे. गावाला जाण्यासाठी लोकांनी गर्दी केली असं सांगण्यात आलं असलं तरी या लोकांकडे सामानही नव्हतं, त्यामुळे या सगळ्याची चौकशी पोलीस करत आहेत.


ट्रेन सुरू व्हायची खरच अफवा असती तर मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून लोकं वांद्रे स्टेशनवर पोहोचले असते. पण मुंबईमध्ये जवळपास प्रत्येक २ किमीच्या अंतरावर चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. एवढी सुरक्षा असताना वांद्रे स्टेशनवर मुंबईच्या दुसऱ्या भागातून लोक येणं अशक्य आहे.


पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे स्टेशनवर जमा झालेली गर्दी वांद्रे स्टेशनच्या आसपास असलेल्या झोपड्यांमधली होती. आता हे लोक एकाच ठिकाणावर, एकाच वेळी कसे एकत्र आले? हा खरा प्रश्न आहे.


'काही खास उद्देश घेऊन ही गर्दी एकत्र आली होती. आपली नाराजी जाहीर करुन प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. यासाठी काही मीडियालाही बोलावण्यात आलं. मीडियाला गर्दी कधी होणार आहे, याची वेळही सांगण्यात आली,' असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ही मीडिया नेमकी कोणती होती? याचीही चौकशी करण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे षडयंत्र होतं का? या बाजूनेही तपास होत आहे.