Local Train Update : सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची प्रतिक्षा वाढणार, कारण...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लोकल प्रवासाची परवानगी लवकर मिळण्याची शक्यता कमीच आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे प्रकरणं कमी होत असताना मुंबई आणि उपनगरातील लोकं लोकल कधी सुरु होते याची वाट बघत आहेत. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची परवानगी आहे. दोन्ही लस घेतलेल्या लोकांना प्रवासाची परवानगी मिळेल अशी चर्चा होती. पण त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सरकारने सर्वसामान्यांना लोकल मधून प्रवासाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे लोकल प्रवासासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यात दुकाने 8 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तर मुंबईत 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. पण लोकलबाबत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
लोकलमध्ये सर्वानाच सरसकट प्रवासाची परवानगी मिळणं कठीण आहे. देशात काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लोकलमधून प्रवासाबाबत परवानगी लवकर मिळेल याबाबतची शक्यता कमीच आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत लोकल प्रवासाबाबत ही चर्चा झाली. ज्यामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, 'मुख्यमंत्री यावर रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करुन निर्णय घेतील.'