Mumbai Local News : खोळंबा! एकाएकी तिकीट आरक्षण बंद; तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक
Mumbai Local News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावं.... रेल्वेच्या सूचना पाहूनच ठरवा आठवडी सुट्टीचे बेत. उन्हातान्हाची धावपळ व्यर्थ न गेलेलीच बरी!
Mumbai Local News : मुंबईतील वाहतूक कोंडीला (Mumbai Traffic) शह देत प्रवाशांना अपेक्षित वेळात अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं किंव किमान त्या ठिकाणाच्या जवळ नेण्याचं काम Mumbai Local अर्थात शहरातील रेल्वेसेवा करत असते. दर दिवशी मुंबईतील या लोकल ट्रेननं लाखो प्रवासी प्रवास करतात. तिन्ही प्रहरांमध्ये धावणाऱ्या या लोकलला आठवड्याच्या शेवटी मात्र काही महत्त्वाच्या कामांसाठी तुकड्या तुकड्यांमध्ये ब्रेक लागतो आणि ही सुस्साट धावणारी लोकल धीम्या गतीवर येते किंवा पूर्णपणे थांबते. आठवड्यातील तोच दिवस आता तोंडावर आला असून, यावेळी पश्चिम रेल्वेची सेवा खंडित होणार आहे.
जम्बो ब्लॉक...
पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) मिळालेल्या माहितीनुसार सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभाल यांसह ओव्हरहेड वायरसरह इतर काही तांत्रिक कामांसाठी रविवार 31 मार्च 2024 रोजी पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा खंडित राहणार आहे. या दिवशी चर्चगेट (Churchgate) आणि मुंबई सेंट्रल (Mumbai Central) या स्थानकांदरम्यान सकाळी 10 वाजून 35 मिनिटं आणि दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत अप, डाऊन जलद मार्गांवर तब्बल 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra News : पर्यटकांवर 'टोल'धाड; महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास महागला
पश्चिम रेल्वे मार्गावर असणाऱ्या या जम्बो ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या गतीनं धावतील, तर काही उपनगरीय रेल्वेगाड्या पूर्णपणे रद्दही करण्यात येणार आहेत. नेहमी चर्चगेचपर्यंत जाणाऱ्या काही रेल्वेगाड्यांचा प्रवास या दिवशी वांद्रे किंवा दादरपर्यंतच मर्यादित असेल. सध्याच्या घडीला रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या ट्रेनची यादी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात देण्यात आल्याचं रेल्वे विभागानं स्पष्ट केलं आहे.
तिकीट आरक्षण बंद?
इथं रविवारी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा खोळंबा होण्याची चिन्हं असतानाच त्याआधी रेल्वेच्या सरसकट सर्वच प्रवाशांना अनेक आव्हानांचा सामाना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार इथं पीआरएस प्रणाली अर्थात 'पॅसेंजर रिजर्वेशन सिस्टीम' पूर्णपणे ठप्प राहणार आहे. 28 मार्च 2024 रोजी रात्री 11 वाजून 5 मिनिटांपासून 29 मार्च 2024 पहाटे 4 वाजून 45 मिनिटांपर्यंत रेल्वेकडून ही सेवा बंद ठेवली जाणार आहे.
रेल्वे विभागाच्या माहितीनुसार (Central Railway) मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे विभागासाठी हा निर्णय लागू असेल. वरील नमूद वेळेदरम्यान रेल्वेसाठीची इंटरनेट तिकीट बुकींग, रिफंड, टच स्क्रीन, आयवीआरएस, कोचिंग टर्मिनल उपलब्ध नसतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.