देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी वर्गातील प्रवाशांना ये - जा करण्यासाठी ठराविक लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. यापुढे मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडे ‘क्यु-आर’ कोडचा ई-पास (ईलेक्ट्रॉनिक) असणे आवश्यक आहे. असे ई-पास देण्यासाठी संबंधित कार्यालये, आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती एकत्रितरीत्या कार्यालय प्रमुखाकडे  सादर करावी.  संबंधित कार्यालयाच्या नोडल अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या कार्यालयातून ई- पास मिळविण्यासाठी समन्वय साधावा, असे आवाहन मुख्य सचिव संजय कुमार यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ई-पास कसा मिळेल?
​उपनगरीय रेल्वेने प्रवास करत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयातील कार्यालय प्रमुखाकडे ई-पाससाठी अर्ज करावा लागेल. या अर्जात कर्मचा-यांची संपूर्ण माहिती देणे आवश्यक असेल, ज्यामध्ये त्याचे नाव, पद, विभाग, राहण्याचे व कामाचे ठिकाण, मोबाईल नंबर यासह इतर बाबींची नोंद आवश्यक असेल.

​हा अर्ज संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाकडून राज्य सरकारच्या नोडल अधिकारी यांच्याकडे सॉफ्ट व हार्ड कॉपीद्वारे देणे अनिवार्य आहे. संबंधित नोडल अधिकारी यांना हे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्याचे अधिकार राहतील. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर,  मंजूर अर्जाच्या कर्मचाऱ्याला याबाबत एसएमएस लिंक पाठवली जाईल. त्यालिंक द्वारे संबधित कर्मचाऱ्यांना एक फॉर्म मोबाईलद्वारे पाठवावा लागेल. यासाठी असणाऱ्या सर्व सूचना पाठविलेल्या लिंकवर उपलब्ध राहतील.

याबरोबरच संबधित कार्यालये, आस्थापना यांच्या नोडल अधिकाऱ्यांना एक आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. याद्वारे संबंधित अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांची अंतिम यादीला मंजुरी देतील. हे सर्व काम राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून करण्यात येईल.सर्व प्रक्रिया झाल्यावर कर्मचाऱ्याच्या मोबाईल फोन वर  'ई-पास'चा "क्यू-आर" कोड येईल. या ई-पास सोबतच संबंधित प्रवाशी कर्मचाऱ्याला उपनगरी रेल्वेचे नेहमीचे तिकीट/मासिक पास खरेदी करून प्रवास करता येईल.