पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच; प्रवाशांना मनस्ताप
Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करता का? पाहून घ्या हे असं तुमच्यासोबतही घडू शकतं. मनस्ताप झालेल्यांमध्ये तुम्हीही होतात का?
Mumbai Local News : लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाईन, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरत नाही. कारण, दर दिवशी याच रेल्वेनं असंख्य़ नागरिक प्रवास करतात. नोकरदार वर्गाची यात मोठी संख्या असते. उपनगरीय भागांतूनही मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईच्या दिशेनं येतात. यामध्ये लोकल प्रवासामुळं त्यांचा प्रवास आणखी सुकर होतो. पण, याच लोकलमुळं मुंबईकरांना मंगळवारी मनस्ताप झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, चर्चगेट हा अंतिम थांबा असला तरीही या स्थानकामध्ये पश्चिम रेल्वेची लोकल पोहोचलीच नाही.
चर्चगेटला लोकल नाही?
आता तुम्ही म्हणाल चर्चगेटऐवजी लोकल फक्त मुंबई सेंट्रलपर्यंतच जाणार की काय? पडला ना प्रश्न? तर, तसं नाहीये. ऐन गर्दीच्या वेळीच आलेल्या अडचणीमुळं पश्चिम रेल्वे विभागाकडून तातडीनं हा निर्णय मंगळवारी (8 ऑगस्ट) घेण्यात आला होता. ज्यामुळं अनपेक्षितपणे मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली. याच स्थानकातून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्याही सुटत असल्यामुळं गर्दीत आणखी भर पडली आणि एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी तर, रुळाची दिशा पकडून पायपीट करत या स्थानकापुढीत ठिकाणं गाठली.
नेमकं काय घडलं होतं?
अनेकांच्या नोकरीला जाण्याच्या वेळेत, म्हणजेच मंगळवारी 8 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास चर्चगेट स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. परिणामी अप मार्गावरील वाहतुकीवर याचे थेट परिणाम झाले. सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि प्रवाशांचा खोळंबा पाहता लोकल तात्पुरत्या स्वरुपात चर्चगेटऐवजी Mumbai Central पर्यंतच चालवल्या गेल्या. ज्यामुळं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
हेसुद्धा वाचा : पुढच्या आठवड्यात मोठी सुट्टी; फिरायला जायचंय? ही घ्या एकाहूनह एक कमाल ठिकाणांची यादी
ग्रँट रोड, चर्नी रोड, मरिन लाईन्स आणि चर्चगेट या भागामध्ये अनेक कार्यालयं असून, तिथं पोहोचण्यासाठी म्हणून निघालेले अनेक नोकरदार मुंबई सेंट्रलला आले आणि तिथं त्यांचा बराच वेळ गेला. जेव्हा सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं लोकल पुढे जाणार नाही ही बाब लक्षात आली तेव्हा या मनस्तापानंही शिखर गाठलं होतं. दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील बिघाडाची माहिती मिळताटच तातडीनं रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचं काम हाती घेतलं आणि 9 वाजून 22 मिनिटांनी हे काम पूर्ण झालं. पण, साधारण अर्ध्या तासानं अनेकांच्या दिवसाची गणितं बिघडली.
दुरुस्तीच्या कामानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली खरी, पण तिथंही ती काही मिनिटं उशिरानंच सुरु होती. कायम मध्य रेल्वेवर वाहतुक खोळंबा आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड येणाच्या बातम्या येत असतानाच इथं पश्चिम रेल्वेवरील हा प्रकार पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.