Mumbai Local Train Update: मुंबईकरांच्या लाइफलाइन म्हणजे लोकल. कामाच्या व शिक्षणासाठी मुंबई शहरात येण्यासाठी वसई -विरार असो किंवा कल्याण-डोंबिवलीकरांचे एकमेव साधन म्हणजे लोकल. लोकलला सातही आठवडे व बाराही महिने गर्दी असते. लोकांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. गाड्यांची संख्या वाढवणे, फेऱ्या वाढवणे असो किंवा एसी लोकल मात्र तरीही लोकलची गर्दी काही तसूभरही कमी झालेली नाही. याउलट गर्दी वाढतेच आहे. नागरिकांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी रेल्वे सतत काहीना काही निर्णय घेत असते. आताही रेल्वे प्रशासनाने रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने रेल्वे कामदेखील करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला, कल्याण, डोंबिवली, वडाळा यासारख्या काही स्थानकातील खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली असल्याने खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राला यासंबंधात माहिती दिली होती. रेल्वे फलाट गर्दी मुक्त करण्याचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, गाडी फलाटावर आल्यानंतर सीट मिळवण्यासाठी नागरिक लोकलमध्ये चढण्यासाठी घाई करतात. अशावेळी कधी कधी चेंगराचेंगरीची घटना घडतात. किंवा लांब पल्ल्यांच्या गाड्या आल्यानंतर अधिक गर्दी वाढते. त्यावर रेल्वेने हा तोडगा काढला आहे. 


रेल्वे फलाटावरील गर्दी कशी कमी करता येईल,याचे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही स्थानकांत पाहणी केली होती. त्यावेळी रेल्वे फलाटांवरील स्टॉलमुळं अधिक जागा व्यापली जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसंच, नागरिकांना रेल्वे स्थानकाबाहेरील दुकानात सहज खाद्यपदार्थ उपलब्ध होतात. त्यामुळंच गर्दीच्या दृष्टीने रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेकडून सुरू आहेत.सध्या कुर्ला, कल्याण, डोंबिवली आणि वडाळा रोड या गर्दीच्या स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 


दरम्यान, यापूर्वी दादर, ठाणे आणि घाटकोपर स्थानकातील फलाटांवरील स्टॉल हटवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने कामदेखील सुरू करण्यात आले आहे. या स्टॉल धारकांना स्थानकातच पर्यायी जागा देण्याचा विचार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.