`मुंबई लोकल`वर झळकतंय आधुनिक महिलांचं रूपडं
हेच बारकावे हेरत....
सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : मुंबई लोकल जशी काळानुसार बदलत गेली, तसे मुंबई लोकलचे डबेही आधुनिक होत आहेत. मुंबई लोकलच्या डब्यात आता मोकळा सूर्यप्रकाश आणि जास्तच जास्त हवा कशी येईल, याकडे लक्ष दिलं जातंय. मेट्रोला टक्कर देण्यासाठी म्हणून काही ठिकाणी हीच लोकल वातानुकूलितही करण्यात आली आहे. यासोबतच मुंबई लोकलमधील महिलाही आता आधुनिक झाल्या आहेत. हाच बदल मुंबई लोकलवर लवकरच दिसणार आहे.
मुंबईतील लोकलसारखीच लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची स्टाईल देखील काळानुरूप बदलत गेली. धकाधकीच्या या आयुष्यात प्रत्येक बदलणाऱ्या गोष्टीप्रमाणे आणि लोकलप्रमाणे महिलाही बदलत आहेत. आता आधुनिक विचारशैलीकडे वेगाने पावलं उचलत आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्यात होणारा हा बदल वेशभूषेतूनही लगेचच लक्षात येत आहे.
महिलांना साडी आवडते, पण रोजच्या धकाधकीत साडीत स्वत:ला सावरत लोकलच्या गर्दीत प्रवास करणं तसं दिव्यचं असतं. साडीला एक वेगळं स्वतंत्र, मानाचं स्थान सणासुदीला या महिला देतातच, पण स्वत:ला धकाधकीच्या आयुष्यात न अडखळता पुढे सहज प्रवास करता येईल असे, आधुनिक शैलीच्या कपड्यांनाच मुंबईतील हल्लीच्या महिलांकडून प्राधान्य दिलं जातं.
वेशभूषेच्या अंदाजातील हेच बारकावे हेरत पश्चिम रेल्वेच्या डब्यावर महिला डबा दर्शविणारं चित्र बदलण्याची तयारी सुरु झाली आहे. साडी घालून डोक्यावर पदर असणाऱ्या महिलेच्या चित्राऐवजी आता कॉर्पोरेट लूकमध्ये सूट-फॉर्मल लूकमध्ये असलेल्या महिलांची चित्र लावण्यात येत आहेत. यासोबतच महिला डब्यामध्ये बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, क्रिकेटर मिताली राज, अंतराळवीर कल्पना चावला यांचे फोटो आणि त्यांचे संघर्ष असणारे फलकही झळकत आहेत. आहे की नाही हा खऱ्या अर्थाने लोकल ते ग्लोबल बदल....?