Maharashtra  Weather Update : उशिरानं का असेना, पण अखेर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला. येत्या तीन ते चार दिवसात राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. नवी मुंबई, पश्चिम उपनगरातही अशीच परिस्थिती असेल. तर, काही ठिकाणी पावसाचा जोर वाढल्यामुळं नागरिकांची त्रेधातिरपीट होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पावसानं जोर धरताच लोकलसेवांवर त्याचा परिणाम होताना दिसतो. तूर्तास मुंबई लोकलची मध्य रेल्वे सेवा आणि पश्चिम रेल्वे सेवा सुरळीत सुरु असून, नागरिकांना सोयीनं प्रवास करता येत आहे. तर, उपनगरीय रेल्वे अशत: उशिरानं असल्याचं कळत आहे. त्यामुळं नोकरी, शाळा, महाविद्यालयं आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना हा मोठा दिलासा ठरत आहे.


राज्याच्या इतर भागातही संततधार


मान्सूननं सध्या राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून, विदर्भापासून कोकणापर्यंत त्याची हजेरी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात संततधार पाऊस सुरूच आहे. सोमवारपासून त्यात आणखी भर पडणार असून, कोकणातल्या काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया परिसरात काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


हेसुद्धा वाचा : ठाकरे गटाचं ब्रह्मास्त्र; 1 जुलै रोजी नेमकं काय घडणार, Video तून ठणकावून सांगितलं 


तिथे माथेरानमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असून 142 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी सध्या माथेरानमध्ये आल्हाददायक वातावरण निर्माण असून सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. इथं येणाऱ्या पर्यटकांचा ओघही वाढताना दिसत आहे. 


तिथं बऱ्याच दिवसांपासून परभणीसह राज्याच्या काही भागांतील शेतकऱ्यांना  पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. मात्र परभणीतल्या पूर्णा शहरात पहिला पाऊस पडला, यात भिजून लहान मुलांनी आनंद लुटला. 


तारीख जिल्हे अलर्ट 
26 जून  मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर , सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली  यलो अलर्ट 
26 जून  रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, गोंदिया आणि भंडारा ऑरेंज अलर्ट
27 जून  सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया यलो अलर्ट 
27 जून  पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर ऑरेंज अलर्ट 
28 जून  रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूर यलो अलर्ट 
28 जून  पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक  ऑरेंज अलर्ट