Political News : राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असतानाच आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता आता विविध राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यातच मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व असणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही पालिकेवरील वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी अनेक मार्गांनी रणनिती आखली जात आहे. याच रणनितीची एक भाग म्हणजे ठाकरे गटाची सध्याची चाल. जिथं आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली 1 जुलै रोजी मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना काढण्यात आलेले रस्ता काँक्रिटीकरणासाठी काढलेले मेगा टेंडर म्हणजे अक्षरशः मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी!
काय आहे नेमका रस्ता घोटाळा? pic.twitter.com/ViSDsl6aUu
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 25, 2023
शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रविवारी या मोर्चाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये पक्षाकडून या मोर्चाचा नेमका हेतू मांडण्यात आला. 'मुंबईकरांच्या पैशांची लूट' असं म्हणत मुंबई रस्ते घोटाळा ठाकरे गटानं उघडकीस आणत सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला.
लोकप्रतिनिधी नसताना 400 किमीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 6080 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले असं सांगताना ठाकरे गटानं इथं काही आकडेवारी मांडली. पुढे शहरात मुळ किंमतीहून तब्बल 66 टक्के दरानं जास्त कामं काढल्याचा गौप्यस्फोट करत आधी 1 किमीच्या रस्त्यासाठी 10 कोटी रुपये लागायचे जिथं आता 17 कोटी रुपये लागणार आहेत ही वस्तुस्थितीही मांडली.
दरम्यान, पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यामुळं आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. पाणी तुंबलं तेव्हा मुख्यमंत्री काय करत होते असा थेट सवालच आदित्य यांनी केला. मुंबईत पाणी तुंबल्यास संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा शिंदेंनी दिला. सोबतच पावसाचं स्वागत करा, बदनामी करू नका असंही ते म्हणाले. त्यावरही आदित्य यांनी टीका केली.
आगामी निवडणुकांच्या धर्तीवर सध्या ठाकरे गट आक्रमक झाला असून, सत्ताधाऱ्यांवर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच हा धडक मोर्चाही शिंदे गटाच्या अडचणी वाढवताना दिसतोय. तेव्हा आता या धडक मोर्चाचे नेमके परिणाम कसे असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.