देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया मुंबई  : मुंबईतील मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत घर नाकाराल्याचं प्रकरण समोर आलं होतं. महिलेने या प्रकरणाची वाचा सोशल मीडियावर (Social Media) उघड केल्यानंतर या राजकीय पडसादही उमटले आहेत. महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.  मराठी महिलेनंतर आता एका मराठी तरुणाला मारहाण करण्याता आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणाची तक्रार वंचित बहुजन आघाडीने पोलिसात दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी तरुणाला मारहाण
देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत उदरनिर्वाहासाठी देशभरातून लोकं येत असतात. सर्वांना सामावून घेणाऱ्या मुंबईत काल रात्री एक धक्कादायक घटना मुंबईतल्या कांदिवली (Kandivali) इथं घडली. सिध्दार्थ अंगुरे नावाच्या एका मराठी तरुणाला परप्रांतिय टोळक्यांनी बळजबरीने 'जय श्रीराम' च्या (Jai Shri Ram) घोषणा द्यायला लावल्या. सिद्धार्थने घोषणा द्यायला नकार दिल्याने तरुणाला या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. तसंच शिवीगाळ करत 'जय श्रीराम बोल नही तो मारुंगा' असं म्हणत परप्रांतीय टोळीने या तरुणाला जबर मारहाण केली. तरुणाचा भाऊ आणि नातेवाईकमध्ये आल्यामुळे कसाबसा हा तरुण थोडक्यात बचावला आहे. त्याच्यावर कांदिवलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय उपचार सुरू आहेत.


याप्रकरणी पीडित कुटुंबियांनी वंचित बहुजन आघाडीकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी सुरज तिवारी, अरुण पांडे, पंडित, राजेश रिक्षावाला यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम 341, 504, 323, 506, 34 अन्वये कांदीवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पोलिसांशी बोलून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करणे, कट्टर धार्मिक बनवून तणाव निर्माण करणे अशा घटनांनी देश होरपळून निघत आहे. मुंबईसारख्या शहरात अशा घटना घडल्याने वंचित कडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय.


गुजराती पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल
दरम्यान मुलुंड मध्ये मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या गुजराती पिता पुत्रांवर अखेर मध्य रात्री गुन्हा दाखल झाला आहे. तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. प्रविण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर या दोघानी तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्याने घर भाड्याने देण्यास नकार दिला होता.या बाबत सोशल मीडियावर त्यानी व्हिडीओ टाकला आणि तो प्रचंड व्हायरल झाला.या प्रकरणी मनसेने सदर महिलेशी संपर्क केला. तेव्हा तृप्ती देवरुखकर यांनी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपींना रात्री ताब्यात घेतलं आहे


महिला आयोगाने घेतली दखल
मुलुंडच्या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे. या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं आहे. मुंबईच्या मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला सोसायटीने ऑफिस देण्यास नकार दिला. तसंच या महिलेशी सोसायटीच्या सदस्यांनी गैरवर्तन केलं.सोशल मीडियाचा आधार घेत तृप्ती देवरुखकर यांनी आपली व्यथा सगळ्यांसमोर मांडली.तो व्हिडिओ माझ्या पाहण्यात आल्यानंतर आयोगामार्फत मी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले होते. याप्रकरणी सहकार आयुक्त,महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव,गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई यांच्याकडून अहवाल मागण्यात आला आहे. सोबतच मुलुंड पोलिसांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.आयोगाच्या  सूचनेनुसार काल रात्री उशिरा मुलुंडमध्ये पोलिसांनी देवरुखकर यांना त्रास देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.संविधानाने दिलेला हक्क नाकारणे, महिलेचा छळ करणे या अनुषंगाने दोषींवर कारवाई व्हावी होईल. याबाबत देवरुखकर यांना न्याय मिळेपर्यंत आयोग पाठपुरावा करेल. असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय.