मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : आज सारी मुंबई धावणार आहे. अर्थातच याला कारण आहे  मुंबई मॅरेथॉन...यंदा जवळपास 44 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. मुंबई मॅरेथॉनचं यंदा चौदावं वर्ष आहे. आशियातील सर्वात मोठी अशी ख्याती असलेल्या या मॅरेथॉनमध्ये व्यवसायिक धावपटूंबरोबरच हौशे नवशेही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात.


यंदा 10 किलोमीटरचा नव्यानं समावेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मॅरेथॉन... भारतीय क्रीडाविश्वातील सर्वाधिक चर्चित अशी क्रीडा स्पर्धा...मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा 10 किलोमीटरचा नव्यानं समावेश करण्यात आलाय.


42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन, 21.097 किलोमीटरची हाफ  मॅरेथॉन, 6 किलोमीटर ड्रिम रन, सिनिअर सिटीझन मॅरेथॉन ही 4.3 किलोमीटरची असेल. तर चॅम्पियन्स विथ डिसऍबिलिटी  ही मॅरथॉन 2.4 किलोमीटरची आणि नव्यानं  समावेश करण्यात आलेली 10 किलोमीटर मॅरेथॉन असं या मॅरेथॉनचं स्वरुप असेल. 


सहा गटांमध्ये स्पर्धा


अशा सहा गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. यावर्षी आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी, आशियाई आणि राष्ट्रकूल सुवर्णपदक विजेती सुधा सिंग यांच्यावर नजरा असणार आहेत.


पुरुषांमध्ये इथिओपियाचा टोकियो मॅरेथॉनमधील उपविजेता सोलोमन देकसीसा आणि मुंबई मॅरेथॉन 2017 उपविजेता केनियाचा जोशूआ कीपकोरीर तर, महिला गटात गतविजेती केनियाची बोरनेस कीतुर आणि 2017 ची विजेती इथिओपियाची शुको गेनेमो यांच्यावर नजरा असणार आहेत.


आपली चमक दाखवण्यास सज्ज


भारताकडून आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी. सोबत मुंबई मॅरेथॉन 2016 चा विक्रम आपल्या नावे करणारा नितेंद्र सिंग रावत, महिलांमध्ये आशियाई आणि राष्ट्रकूल स्पर्धेत स्टिपलचेसमध्ये सुवर्णपदक मिळवणारी सुधा सिंग ही एल. सुरीया सोबत आपली चमक दाखवण्यास सज्ज असेल.


माजी पोल वॉल्ट खेळाडू सर्गे बुबका यावर्षी स्पर्धेचे सदिच्छा दूत असणार आहेत. मुंबईत सध्या मेट्रोचं काम जोरात सुरू असल्यानं यंदा मॅरेथॉनचा मार्ग बदलला जाणार अशी जोरदार चर्चा होती. 


मॅरेथॉनचा मार्ग तोच


मात्र केवळ फिनिशिंग लाईनजवळ अगदी अंतिम टप्प्यात थोडे बदल वगळता मॅरेथॉनचा मार्ग तोच ठेवण्यात आला आहे. बॉलीवूड, सलेब्रिटीज आणि उद्योगपती यांचा सहभाग दरवर्षीप्रामाण यंदाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.