मुंबई : मुंबई मॅरेथॉनचे आयोजक प्रोकॅमला मुंबई उच्च न्यायालयानं चांगलाच तडाखा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारपर्यंत आयोजकांनी पालिकेकडे ७९ लाख रूपये भुईभाडे आणि २६ लाख रूपये अनामत रक्कम म्हणून जमा केले तरचं २१ जानेवारीला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉनला परवानगी द्या, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं जारी केलेत.


रक्कमेत आयोजकांना दिलासा 


२१ जानेवारीला १५वी 'मुंबई मॅरेथॉन' होऊ घातली असताना सोमवार १५ जानेवारीपर्यंत आयोजकांनी बीएमसीकडे ही रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले गेलेत.


गेली आठ वर्ष आयोजक पालिकेला २६ लाख रूपये अदा करत आलेत. मग यंदा ही अचानकपणे ही रक्कम वाढवून ३.६६ कोटी इतकी करण्यात आल्याविरोधात 'प्रोकॅम'नं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिलासा देताना न्यायालयानं १.०५ कोटी जमा करण्याचे आदेश दिलेत.


गेल्या वर्षीही वाद


गेल्या वर्षी आयोजकांनी मंडप, स्टॉल्स आणि विशेष मार्गिका उभारण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे खणले होते. त्यावरूनही पालिका आणि आयोजकांत मोठा वाद झाल्याचं समोर आलं होतं.


त्यामुळे यंदा स्टॉल्स, मंडप, जाहिरातींचे फलक या सर्वांसाठी भाडं आणि अनामत रक्कम आगाऊ वसूल करण्याकरता पालिकेनं ठराव पास केलेला आहे.