मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शनिवारी 11 वाजण्याच्या सुमारास अज्ञान व्यक्तीकडून धमकीचा फोन आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारु आणि मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या या फोननंतर मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंना दिलेल्या धमकीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत बनून मातोश्रीचं रक्षण करु अशी प्रतिक्रिया देत याचा निषेध केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मातोश्रीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचा निषेध करते. आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत उभी करुन मातोश्रीचं रक्षण करु, मातोश्रीचं रक्षण करणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करुच' असं महापौर म्हणाल्या. 


महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि केंद्रातून पंतप्रधानही याकडे निश्चित लक्ष देतील. आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मातोश्रीची वीटही ते हलू देणार नाहीत. आम्ही शिवसैनिक, पोलीस उद्धव ठाकरेंच रक्षण करण्यासाठी समर्थ असल्याचं महापौरांनी सांगितलं. 


अशाप्रकारे धमकी देऊन मुख्यमंत्र्यांना कोणी विचलित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर उद्धव ठाकरे विचलित होणार नाहीत. ते संयमी नेतृत्व आहे, ते विचारपूर्वक काम करणारं नेतृत्व आहे. कोरोना महामारीमध्ये इतकं व्यवस्थित काम करणारं, असं नेतृत्त्व अशा पोकळ धमक्यांनी विचलित होऊ शकत नाही, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी या गोष्टींचा निषेध केला आहे.



मातोश्रीवर फोन करणारा व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. तसंच लँडलाईवर चार वेळा आलेला फोन हा दुबईहून आल्याची माहिती मिळत आहे. आता कॉल करणारा व्यक्ती कोण होता, याचा तपास सुरु असून मातोश्रीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.