Mumbai Metro 3 Update: मुंबई शहरात आणखी एक मेट्रो सेवा सुरू होत आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. तसंच, मुंबईकरांना भूमिगत मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो 3 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर मेट्रोची एकात्मिक चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतर आता लवकरच संशोधन डिझाइन आणि RDSOची चाचणी सुरू होणार आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात मुंबई मेट्रो 3 सुरू होण्याची शक्यता आहे. या मेट्रोमुळं प्रवाशांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएसआरसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोची पहिली चाचणी पार पाडल्यानंतर मेट्रोची चाचणी घेण्यासाठी मेट्रो रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्डस ऑर्गनायझेशन (RDSO)कडे अर्ज पाठवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील आरडीएसओ चाचणी जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी मेट्रोचा वेग, यंत्रणा, सुरक्षा आणि रोलिंग स्टॉक तपासला जाणार आहे. RDSOकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अंतिम CRS चाचणीसाठी अर्ज केला जाणार आहे. जुलैपर्यंत सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. 


मेट्रो-3 कॉरिडॉरच्या पहिला टप्पा आरे कॉलनी ते बीकेसी दरम्यान सुरू होणार आहे. यासाठी गेल्या वर्षभरापासून मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे. सिग्नलिंग सिस्टीम, टेलिकम्युनिकेशन, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर आणि ट्रॅकच्या चाचणीचे कामही पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर एमएसआरसीने आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्याचे कामही जवळपास पूर्ण केले आहे. पहिल्या टप्प्यात 9 गाड्यांसह मेट्रो सेवा सुरू होणार असून या 9 गाड्यांच्या तपासणीचे कामदेखील पूर्ण झाले आहे. 


मुंबई मेट्रो 3 कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्पा सुरू करण्यासाठी अतिरिक्त 11 ट्रेन मुंबईत पोहोचल्या आहेत. या अतिरिक्त 11 गाड्यांच्या चाचणीचे कामही सुरू करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची एकूण लांबी 33 किमी असून एकूण 27 स्थानके आहेत. पहिला टप्पा आरे ते बीकेसी दरम्यान आहे. या टप्प्यात 10 स्थानके असणार आहेत. 


मुंबई मेट्रो 3 स्थानके कोणती असतील?


कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.