CORONA THIRD WAVE : न आलेल्या कोरोनाच्या लाटेसाठी 100 कोटींचा `पाहुणचार`, विरोधकांचा शिवसेनेवर निशाणा
तिसरी लाट येणार असं गृहीत धरून तयारी सुरु केल्याचं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईत (Mumbai) कोवीडची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर झालेली असतानाही मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या (Covid Third Wave) तयारीवर 100 कोटी रूपये खर्च करण्याची तयारी करत आहे. जम्बो कोविड केंद्रावर (Jumbo Covid Centre) हा खर्च केला जाणार असून कोविड सेंटरमध्ये आयसीयू, ऑक्सिजन बेड्स, पेडियाट्रीक आयसीयू डायलिसीस आयसीयू सेवांसाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे.
विरोधकांनी मात्र यावरून सत्ताधारी शिवसेनेला (Shiv Sena) लक्ष्य केलं आहे. पालिकेनं अगोदरच कोवीड संकटावर हजारो कोटी रूपयांचा खर्च केलेला आहे. लसीकरणामुळं आणि हर्ड इम्युनिटीमुळं तिसऱ्या लाटेचा मोठा धोका मुंबईला जाणवत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळं कारण नसताना हा खर्च करू नये असं विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी म्हटलं आहे. तर तिसरी लाट येणार असं गृहीत धरून ही तयारी केली जात असल्याचं शिवसेनेचे म्हणणं आहे.
महापालिकेच्या बीकेसी, दहिसर, सोमय्या मैदान, कांजूरमार्ग आणि मालाड या पाचही जंबो कोविड सेंटरमध्ये अतिदक्षता, ऑक्सिजन आणि विना ऑक्सिजन बेड्सचे तीन महिने अथवा कोविड- १९ चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत, यापैकी जो कालावधी कमी असेल त्या कालावधीत व्यवस्थापन राखण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पण कोणत्याही वैद्यकीय संस्थांना कार्यादेश देण्यात आलेले नसून, तिसरी लाट उद्भवल्यास प्रशासनाला तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी ही तयारी करुन ठेवली असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. जंबो कोविड केंद्रांतील व्यवस्थापनासाठी मागवण्यात आलेल्या निविदेत 13 देकार प्राप्त झाले आहेत . त्यातील रुबी ऑलकेअर सर्विसेस, लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस, ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड आणि मुलुंड ऍपेक्स हॉस्पिटल यांच्या निविदा कमी खर्चाच्या असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे .
बीकेसी जंबो कोविड सेंटर
- आयसीयू बेड - 108
- नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव - ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड
- तीन महिन्यांकरता होणार खर्च - 5 कोटी 63 लाख 66 हजार 280 रुपये
दहिसर जंबो कोविड सेंटर
- आयसीयू बेड - 100
- ऑक्सिजनेटेड - 613
- नॉन ऑक्सिजनेटेड - 117
- नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव - लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस
- तीन महिन्यांकरता होणार खर्च - 14 कोटी 5 लाख 3 हजार 680 रुपये
सोमय्या मैदान जंबो कोविड सेंटर
- आयसीयू बेड - 200
- ऑक्सिजनेटेड - 750
- पेडियाटीक आयसीयू - 50
- पेडियाटीक - 100
- नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव - ऍपेक्स हॉस्पिटल,मुलुंड
- तीन महिन्यांकरता होणारा खर्च - 22 कोटी 47 लाख 75 हजार रुपये
कांजूरमार्ग जंबो कोविड सेंटर
- आयसीयू बेड - 150
- ऑक्सिजनेटेड - 1200
- नॉन ऑक्सिजटेड - 300
- पेड्रीयाटीक आयसीयू - 50
- नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव - मेडटायटन्स मॅनेजमेंट
- तीन महिन्यांकरता होणारा खर्च - 28 कोटी 23 लाख 39 हजार रुपये
मालाड जंबो कोविड सेंटर
- आयसीयू बेड - 190
- ऑक्सिजनेटेड - 1536
- नॉन ऑक्सिजटेड - 384
- डायलिसीस आयसीयू - 20
- ट्राएज (आयसीयू) - 40
- नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव - रुबी ऍलकेअर सर्विसेस
- तीन महिन्यांकरता होणारा खर्च - 34 कोटी 51 लाख 87 हजार 260 रुपये