मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी इतर नगरसेवकांसह महापौर दालनात अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. प्रभाग समितीची निवडणूक आज होणार होती. मात्र प्रशासनाचे अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे संतापलेल्या महापौरांनी दालनात अधिकाऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी गैरहजर राहील्यामुळे प्रभाग समितीची निवडणुकीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. हे अधिकारी का गैरहजर राहिले, याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, विरोधकांना याप्रकरणी शिवसेनेला टोला लगावला आहे. मुंबईच्या महापौर किती हतबल आहेत, त्यांना त्यांचेच अधिकारी निवडणुकीसाठी हजर न राहिल्याने आज त्यांच्याच दालनासमोर ठिय्या आंदोलन करावे लागले, हा सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक की त्यांच्या कर्माची फळे, असा सवाल भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.



दरम्यान, मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळाले. राज्यात महाविकास आघाडी असल्याने मुंबई पालिकेतही आघाडी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने केलेले मतदान तसेच काँग्रेसने उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या दिलेला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपला एकटे पाडून शिवसेनेने आपले वर्चस्व राखले. दरम्यान, २०२२मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला टक्कर देण्यासाठी तिन्ही पक्षांना समित्या देऊन पालिकेत महाआघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


वैधानिक समिती निवडणूत घडामोडींमुळे पालिकेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष यांची महाआघाडी स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फेब्रुवारी २०२२मध्ये पालिकेची सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे २०२१ हे वर्ष सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तशी मोर्चेबांधणी आणि जुळवाजुळव सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.