Nair Hospital Sexual Harassment: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात लैंगिक छळवणुकीचे प्रकरण समोर आले होते. एमबीबीएसच्या विद्यार्थिनींकडून लैंगिक छळ केल्याच्या आरोप करण्यात आला. यानंतर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.


डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


माजी महापौरांनी विचारला जाब


नायर रुग्णालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थिनींकडून लैंगिक छळ केल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर नायर रुग्णालयात पोहोचल्या. त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. यानंतर किशोरी पेडणेकर यांनी आग्रीपाडा पोलीस ठाणे येथे भेट दिली. नायर रुग्णालय येथील डीनची बदली करून उपयोग नाही. आता निलंबनाची कारवाई करण्याची किशोरी पेडणेकर यांची मागणी त्यांनी केली आहे.