Mumbai Crime : दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. देशाच्या सुरक्षेशी संबधिंत अतिशय महत्त्वाची आणि गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याबद्दल एका संशयिताला एटीएसने अटक केली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने माझगाव डॉकयार्ड येथून एका स्ट्रक्चरल फ्रॅब्रिकेटरला प्रतिबंधित क्षेत्राशी संबधित माहिती पाकिस्तानी गुप्तपरांना पाठवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. आरोपीने ही माहिती पाकिस्तानी इंटेलिजन्स युनिटला पाठवल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मिडीयाद्वारे पाकिस्तान आधारित गुप्तचर यंत्रणा (PIO) यांना प्रतिबंधित क्षेत्राची माहिती दिल्याने संशयीत इसमावर एटीएसकडून कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाला यासंदर्भातील गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. एक भारतीय संशयीत इसम हा पाकिस्तान आधारित गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कामध्ये असून त्याने भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवली आहे, अशी माहिती एटीएसला मिळाली होती.


दहशतवाद विरोधी पथकाकडून नमुद संशयीत इसमाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान संशयीत इसमाची नोव्हेंबर 2021 ते मे 2023 या कालावधीत फेसबुक आणि व्हॉटस्अॅपव्दारे एका पाकिस्तान आधारित गुप्तचर यंत्रणेशी ओळख झाली होती. या संशयीत इसमाने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या फेसबुक आणि व्हॉटस्अॅप अकाऊंटवर चॅटींग करून त्यांना भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे निष्पन्न झाले आहे.


दरम्यान, या प्रकरणी संशयीत इसम व संपर्कातील गुप्तचर यंत्रणेविरुद्ध दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात संशयीत इसमास अटक करण्यात आली असून नवी मुंबई युनिट, दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक या माहितीवर काम करत होते. एक व्यक्ती पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेच्या लोकांना सरकारची गोपनिय माहिती पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये ही व्यक्ती काम करत होती. दोन वर्षांमध्ये ही व्यक्ती फेसबुकच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. या व्यक्तीने कोणती माहिती दिली आणि त्याने कोणाला माहिती पुरवली याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.