Mumbai News : अरे देवा! आज मुंबई शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा 30- 100 टक्के बंद
Mumbai News : जाणून घ्या, शहराच्या कोणत्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आणि तुम्ही राहता तिथं नेमका कितपत परिणाम दिसून येणार?
Mumbai News : उन्हाळा सुरु होण्याआधीपासूनच मुंबईकरांवर पाणीसंकट आलं असून, मंगळवारी शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा 100 टक्के तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा 30 टक्के बंद राहणार आहे. उपलब्ध माहितीनुसार पिसे येथील उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागल्याने मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पाणीपुरवठ्यावर इतका परिणाम का?
(Mumbai BMC) सोमवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात असणाऱ्या संयंत्राला आग लागण्याची घटना घडली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरिय जलाशय, ट्रॉम्बे उच्चस्तरिय जलाशय, घाटकोपर निम्नस्तरिय जलाशय तसेच शहर विभागातील एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग, गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील. तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई 2, 3 जलवाहिन्यातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील असं सांगण्यात आलं आहे.
हेसुद्धा वाचा :अंबाबाई मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणार; दोन महिन्यात अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश
याशिवाय शहर विभाग, पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठ्यामध्ये 30 टक्क्यांनी कपात करण्यात येत आहे. सबब, संबंधित भागांमधील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे.
कोणकोणत्या भागात 30 टक्के पाणीकपात?
उल्लेख करण्यात आलेल्या विभागांव्यतिरिक्त उर्वरित महानगरपालिकेतील विभाग, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर विभागात पाणीपुरवठा 30 टक्के कमी असेल.
कुठं असेल 100 टक्के पाणीकपात?
एम पूर्व व एम पश्चिम संपूर्ण विभाग, एफ दक्षिण व एफ उत्तर संपूर्ण विभाग, भंडारवाडा जलाशयातून पाणीपुरवठा होणारा ई, बी आणि ए विभाग, टी विभाग (पूर्व आणि पश्चिम), एस विभाग (नाहूर पूर्व, भांडुप पूर्व, विक्रोळी पूर्व), एन विभाग (विक्रोळी पूर्व, घाटकोपर पूर्व, सर्वोदय नगर, नारायण नगर) येथे 100 टक्के पाणीपुरवठा बंद असेल.