Mumbai News : संकट आणखी वाढलं; मुंबईत 5 मार्चपर्यंत पाणीकपात
Mumbai News : मुंबई शहरावर उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पाणीबाणीचं संकट ओढावलं असून, आता म्हणे शहरात 5 मार्चपर्यंत पाणीकपात लागू राहणार आहे.
Mumbai News : उन्हाच्या झळा अद्याप तीव्र झाल्या नसल्या तरीही मुंबईमध्ये मात्र नागरिकांना उन्हाळ्याचा दाह सोसावा लागताना दिसत आहे. कारण, शहरात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पिसे येथील उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईतच सरसकट 15 टक्के पाणी कपात लागू करावी लागणार आहे. या उदंचन केंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर पूर्ण जळाल्यामुळे काही पंप बंद ठेवावे लागणारे आहेत हीच वस्तुस्थिती आता समोर येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार जळाल्यामुळं नुकसान झालेला हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होण्यास साधारण 5 मार्चपर्यंतचा वेळ लागू शकतो. परिणामी 5 मार्चपर्यंत शहरात 15 टक्के पाणी कपात लागू असेल. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाची नागरिकांनी नोंद घेत योग्य ते नियोजन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
हेसुद्धा वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याकडून घेतली प्रेरणा, पाहा विधानसभेत काय म्हटलं?
कोणकोणत्या भागात लागू असेल पाणीकपात?
मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळं सध्या संपूर्ण मुंबईत दहा टक्के पाणी कपात करण्याबाबत पालिका प्रशासन विचार करत आहे. दरम्यान, सध्या संपूर्ण मुंबई शहरासह पश्चिम उपनगरं, पूर्व उपनगरं आणि ठाणे शहर, भिवंडी, नगर बाह्य विभागांना मुंबई 2 आणि 3 या जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात आलीय.
ट्रान्सफॉर्मरची आग विझताच प्रशासनानं परिस्थितीचा आढावा घेऊन ताबडतोब दुरुस्ती काम हाती घेत सद्यास्थितीपर्यंत 20 पैकी 15 पंप सुरू केले. अचानक ओढावलेल्या या संकटामुळं आणि ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीपुरवठा कमी होत असल्यामुळं आता नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, त्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. या काळात मुंबईकर नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब अशी की, ही पाणीकपात आगीच्या संकटामुळं लागू असून येत्या काळात उन्हाळ्याच्या धर्तीवर वाढीव पाणीकपात प्रशासन करणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.