प्रार्थनेच्या तासाला शिक्षिकेने वाजवली अजान! मुंबईतील शाळेमधील धक्कादायक प्रकार
Azan Played In School: मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे सकाळच्या शाळेच्या सत्रात अजान वाजवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याविरोधात दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली आहे.
Azaan in School : गेल्या काही दिवसांपासून विविध घटनांमुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचे चित्र आहे. अशातच मुंबईच्या (Mumbai News) एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर, मुंबईच्या कांदिवली ( Kandivali) येथील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या (Kapol Vidyanidhi International School) एका शिक्षकाला सकाळच्या प्रार्थनेवेळी अजान (Azaan) वाजवल्याचा आरोपांखाली निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून राजकीय पक्षांनी शाळेसमोर जोरदार आंदोलन करत याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
कांदिवलीच्या कपोल विद्यानिधी शाळेमध्ये शुक्रवारी सकाळी प्रार्थनेनंतर अजान लावली गेल्याने वाद निर्माण झाला होता. सकाळी विद्यार्थ्यांची प्रार्थना सुरू असताना अजान लावल्यामुळे या विरोधात काही पालकांनी शाळेच्या विरोधात आवाज उठवला होता. तर शाळेने लाऊड स्पीकरवर अजान लावल्यानंतर पालकांच्या भावना दुखाल्यामुळे या विरोधात शिवसेनेकडून कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाळेने अशाप्रकारे लाऊड स्पीकरवर यापुढे अजान लावू नये असं पत्र लेखी स्वरूपात शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी महावीर नगर येथील कपोल विद्यानिधी शाळेच्या सकाळच्या सत्राचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये लाऊडस्पीकरवर इस्लामिक प्रार्थना सुरु असल्याचे ऐकू येत होते. पालकांपैकी बहुतेकजण सकाळी शाळेच्या परिसरात फिरायला येतात. शाळेतील सकाळच्या प्रार्थनेदरम्यान अजान ऐकू आल्याने पालकांना धक्का बसला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच पालक शाळेत जमा होऊ लागले. त्यानंतर पालकांसोबतच भाजप कार्यकर्त्यांनी शाळेच्या परिसरात मोठे आंदोलन सुरु केले. स्थानिक भाजप आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनानंतर ज्या शिक्षिकेने सकाळी अजान लावले होते तिच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली. त्यानंतर पालकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आलं
शाळेने दिलं स्पष्टीकरण
"आमच्या शाळेत प्रत्येक धर्माच्या प्रार्थना विद्यार्थ्यांना समजायला हव्यात म्हणून आम्ही त्या लाऊड स्पीकरवर लावतो. मग त्यामध्ये गायत्री मंत्र असेल कॅरोल सिंगिंग असेल किंवा मग इतर धर्मियांच्या प्रार्थना असतील. या प्रार्थना विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी हा उपक्रम असतो. यामध्ये आज लाऊड स्पीकर अजान लावण्यात आली होती. मात्र पालकांच्या भावना लक्षात घेता आम्ही अजान बंद केली. आम्ही पालकांचं म्हणणं आम्ही ऐकून घेत आहोत. आता यापुढे अशाप्रकारे आम्ही शाळेत आजान लावणार नाही असं आम्ही सर्वांना आश्वासन देत आहोत, असे स्पष्टीकरण शाळेने दिलं आहे.
पोलीस काय म्हणाले?
"एका शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळी अजान वाजवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करणार आहोत. तसेच या प्रकरणात जी काही कारवाई असेल ती होणार आहे,' अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.