Mumbai News: ब्रिटीशांच्या काळापासून सत्ताकारण, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणामध्ये केंद्रस्थानी असणारा आणि सातत्यानं सर्वांच्या आकर्षणाचाच केंद्रबिंदू असणारा एक मुद्दा म्हणजे मुंबई शहर. या शहराचा आतापर्यंतचा विकास पाहताना सात विभक्त बेटांच्या एकत्रिकरणातून हे शहर कसं तयार झालं हे पाहताना अनेकजण भारावून जातात. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच जगाच्या नकाशावर आपलं वेगळेपण जपणाऱ्या या मुंबई शहरामध्ये दर दिवशी विकासाच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि त्याचा परिणाम या शहरावर आणि शहरातील नागरिकांवर होताना दिसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे शहरातील राजकारण आणि राजकीय धोरणं. गेल्या काही काळापासून मुंबईचा सर्वांगीण विकास दृष्टीक्षेपात ठेवत काही मोठ्या प्रकल्पांचे प्रस्ताव पुढे करण्यात आले. यापैकी काही संकल्पनांना पूर्णत्वास नेत संपूर्ण जगाच्या नजरा या शहरानं वळवल्या. 730 दिवसांनंतर अर्थात 2025 नंतर तर या शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे. हा बदल नेमका कसा असेल तुम्हाला माहितीये? 


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतंच Mumbai Metropolis Metaverse लाँच केलं. ज्यामध्ये शहराचं आभासी प्रतिनिधित्त्वं (virtual representation) सादर करण्यात येत आहे. एका महानगरापासून मुंबई जागतिक स्तरावरील एक उत्तम शहर म्हणून नेमकं कसं आकारास येईल याचंच चित्रण तिथं करण्यात आलं. ही संकल्पना इतकी कमाल आहे की या माध्यमातून शहरात सध्या सुरु असणारी विकासकामं आणि भविष्यातील प्रकल्पांचं metaverse रुप पाहता येणाप आहे. 


तंत्रज्ञानाचं कमाल उदाहरण सादर करणाऱ्या या मेटावर्स शोकेसमध्ये 12 महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. यामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि कोस्टल रोडचा समावेश आहे. या मेटावर्समध्ये मुंबई 2025 मध्ये नेमकी कशी असेल याचं 3D रुप पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे, तर यामुळं शहरातील नागरिकांना भविष्यात नेमक्या कोणकोणत्या सुविधा पुरवण्यात येणार आहे आणि या शहरासोबतच त्यांचाही विकास कसा होणार आहे याचेच संकेत मिळत आहेत. 


हेसुद्धा पाहा : PHOTOS: इंग्लंडच्या राजाला आहेरात मिळालेलं भारतातील 'हे' शहर आज आहे सोन्याची खाण; माहितीये का त्याचं नाव?


X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फडणवीसांनी Mumbai Metropolis Metaverse लाँच करत या शहरावर प्रेम करणाऱ्यांसोबतच शहरातील सर्वच नागरिकांना या शहराच्या बदलत्या रुपाचे आणि प्रगतीचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केलं. तुम्हीही मुंबई नेमकी कशी बदललेय हे प्रत्यक्षात पाहू शकता याचीच माहिती फडणवीसांनी त्यांच्या पोस्टमधून दिली. 




मेटावर्समध्ये दिसणाऱ्या प्रकल्पांमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोअर, मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो प्रकल्प, ऐरोली कटई भुयारी मार्ग, विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे.