Mumbai Trans Harbour Link Latest News: देशातील सर्वात मोठा सागरी सेतू, म्हणून नागरिकांच्या सेवेत आलेल्या आणि अनेकांचाच प्रवास सुखकर करत प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची मोठी बचत करणारा अटल सेतू अनेकांसाठीच वरदान ठरत आहे. 45 मिनिटांचा मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास या नव्या सागरी सेतूमुळं अवघ्या 20 मिनिटांमध्ये पूर्ण होत आहे. असं असतानाच या मार्गानं प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवरून लाखो वाहनांनी प्रवास केला. या प्रवासामुळं अटल सेतूच्या मार्गावर कोट्यवधींची रक्कम टोलच्या स्वरुपास वसूल करण्यात आली. पण, आता इथून प्रवाशांवर नेमकी कारवाई का होणार? तुम्हालाही असाच प्रश्न पडलाय का? 


सुधारणार कधी? 


प्रशासनाच्या माहितीनुसार अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून ये-जा करणाऱ्या अनेक वाहनचालक अगदी सर्रास वेगमर्यादेचं उल्लंघन करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ‘अटल सेतू’वर ताशी 100 किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आलेली असतानाही वाहनधारक मात्र इथून भरधाव वेगात वाहनं नेत असून, बेधडकपणे या नियमाची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळं तुमच्याकडूनही उत्साहाच्या भरात ही चूक झाली असल्यास दंडात्मक कारवाईसाठी सज्ज व्हा.  उपलब्ध माहितीनुसार वेगमर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत महिनाभरात 1200 हून अधिक वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली असून हा आकडा वाढतच चालला आहे.


वाहनाची वेगमर्यादा ओलांडणाऱ्या या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, त्यांच्याकडून 1500 रुपये इतकी दंडवसुली करण्यात येत आहे. असं असतानाही बरीच वाहनं भरधाव वेगातच या वाटेवरून जात असल्यामुळं येत्या काळात एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांकडून यासंदर्भातील कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 


हेसुद्धा वाचा : Mumbai News : गणेशोत्सवाच्या काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना; मंडळांनी पालन करा अन्यथा... 


दरम्यान, जानेवारी 2024 मध्ये लोकार्पण झालेल्या अटल सेतूमुळं अनेकांनाच वाहतूक कोंडीतून वाट मिळाली. पण, या मार्गावर ताशी 100 किमीची वेगमर्यादा असतानाही अनेकजणांकडून वाहनं ताशी 120, 130 आणि 140 किमी इतक्या वेगानं चालवण्यात येत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आपण वेगानं इथून जाऊ अशा अविर्भावात असणाऱ्यांचं वाहन या मार्गावर असणाऱ्या ‘एमएमआरडीए’च्या नियंत्रण कक्षातील कॅमेरात कैद होत आहे. त्यामुळं या मार्गानं जाताना वेगमर्यादा ओलांडू नका, नाहीतर भरावा लागेल हजारोंचा दंड.