नारळी पौर्णिमेला गोड बातमी, गिरणी कामगारांसाठी 2521 घरांची सोडत
Mumbai Homes : अखेर घराचा प्रश्न मिटणार. पाहा गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भातील मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी. कोणत्या भागात घरं, कधी सोडत? सर्व माहिती एका क्लिकवर
Housing News : गिरणी कामगारांची घरं हा प्रश्न कायम चर्चेचा विषय ठरला आहे. आता पुन्हा एकदा हाच मुद्दा प्रकाशझोतात आला असून, येत्या काळात या वर्गासाठी तब्बल 2521 घरांची सोडत जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं गिरणी कामगारांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. प्राथमिक माहितीनुसार रायचूर, रायगड, रांजगोळी या भागांमध्ये असणाऱ्या घरांचा या सोडतीमध्ये समावेश असणार आहे.
एमएमआरडीएकडून गिरणी कामगारांसाठी म्हाडाला मिळणाऱ्या या हजारो घरांची सोडत येत्या काळात जाहीर होणार आहे. कधी एकेकाळी मुंबईचा कणा असणाऱ्या आणि सध्या मात्र बंद असणाऱ्या जवळपास 58 कापड गिरण्यांच्या जागेवरील घरांसाठी जवळपास 1 लाख 74 हजार कामगार आणि वाससदारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 10 हजार 701 गिरणी कामगारांना आतापर्यंत घरं मिळाली आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बॉम्बेडाईंग आणि श्रीनिवास मिलमधील 500 पात्र गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांना घराच्या चाव्याही देण्यात येणार आहेत.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रासह कोकणात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता, उर्वरित भागात काय परिस्थिती?
सद्यस्थितीला रांजगोळी येथे असणाऱ्या घरांती दुरूस्तीकामं हाती घेण्यात आली असून, येत्या तीन महिन्यांमध्ये ही कामं पूर्णत्वास जातील आणि त्यानंतर गिरणी कामगारांनाच केंद्रस्थानी ठेवक म्हाडा आणि कामगार विभाग अर्ज छाननी आणि पात्र अर्जांची यादी तयार करण्यावर भर देतील. प्राथमिक स्तरावर उपलब्ध घरं गिरणी कामगारांना पुरवली जात असतानाच काही कामगारांच्या मागणीनुसार त्यांना पश्चिम महाराष्ट्रातही घरं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन विचाराधीन असल्याचं संबंधित यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
सिडकोच्या घरांचे दर कमी...
इथे म्हाडा आणि गिरणी कामगारांच्या घरांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असतानाच तिथे सिडकोच्या घरांच्या किमती कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सिडकोत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. सिडकोनं काही योजनांच्या घरांच्या किंमती तब्बल 9 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. उलवे नॉडमधील बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानक परिसरातील घरांच्या किंमती तब्बल 9 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सिडकोनं घेतला आहे.