Parel Bridge Accident: मुंबईतील परळ येथील उड्डाणपुलावर आज पहाटच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 तरुणींचाही समावेश आहे. पहाटे साडेसहाच्या दरम्यान हा अपघात झाला. ट्रीपल सीट बाईक चालवणे जीवावर बेतलं आहे. भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.


डंबरला दिली धडक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, 2 तरुणी आणि एक तरुण एमएच 01 ई के 9839 या दुचाकीवरुन जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटलं. भरधाव वेगात नियंत्रण सुटलेली ही दुचाकी समोरुन येणाऱ्या एमएच 03 सी पी 4142 या डंपरच्या उजव्या बाजूला आदळली. दुचाकी इतक्या वेगात होती की या डंबरचा पुढचा भाग आत चेपला गेला. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांचाही मृत्यू झाला आहे. ओव्हरटेकिंग आणि ओव्हरस्पीडमुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याबद्दलची ठोस माहिती मिळालेली नाही.


वाहतूक कोंडी


अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं समजू शकलेली नाही. मात्र भोईवाडा पोलिसांचे एक पथक या अपघाताचा आढावा घेत असून नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती घेत आहेत. या अपघातामुळे अरुंद उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अपघातग्रस्त वाहने उड्डाणपुलावरुन बाजूला काढली. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला काढल्यानंतर येथील वाहतुक सुरळीत झाली. बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर चाप लावण्यासाठी रात्रीच्या वेळी तसेच पहाटे पोलिसांची गस्ती पथकं मुंबईमध्ये फिरत असतात. मात्र वेगाशी स्पर्धा करण्याच्या नादात अनेकदा अपघात होत असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं आहे.